
दाजीपूर रस्ता सुरू
दाजीपूर रस्ता वाहतुकीसाठी खुला
राधानगरी ता. १७ : मोऱ्या आणि पुलांच्या विशेष दुरुस्ती, पुनर्बांधणी कामाला वन्यजीव विभागाच्या हरकतीने लांबणीवर गेल्याने राधानगरी -दाजीपूर राज्यमार्ग आजपासून वाहतुकीसाठी पूर्ववत खुला केला आहे.
५० हून अधिक मोऱ्या, पठाण पुलाची विशेष दुरुस्ती आणि डांबरीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हा राज्यमार्ग १ एप्रिल ते ३१ मेपर्यंत दोन महिने वाहतुकीसाठी बंद केला होता. राज्य मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती, तर हलक्या वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली होती. मात्र, वन्यजीव विभागाच्या हरकतीने काम सुरू ठेवण्यास अडसर आल्याने अवघ्या पंधरा दिवसातच रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम विभागावर आली. वाहतूक बंद राहिल्याच्या काळात तीस किलोमीटर अंतरापैकी केवळ १५ किलोमीटर अंतरातील डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले. आता उर्वरित बाकी काम वन्यजीव विभागाच्या परवानगीनंतरच होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानगीसाठी फेरप्रस्ताव वन्यजीव विभागाकडे सादर केला आहे. प्रस्तावानुसार वन्यजीव विभागाच्या नागपूरस्थित मुख्य वनसंरक्षकांकडून परवानगी मिळेल त्यावेळीच बाकी काम सुरू करणे शक्य होणार आहे. परवानगीची कार्यवाही नजीकच्या काळात होण्याची शक्यता कमी असल्याने पावसाळ्यानंतरच बाकी काम मार्गी लागणार आहे.