मोकळा तलाव आणि

मोकळा तलाव आणि

03350, 03351

हसणे : राधानगरी तलावाचे पाणी संपत आल्याने आपले अस्तित्व दाखवणारा जुना रस्ता, जुने गाव आणि सभोवतालचा परिसर.
....
हिरवीगार जंगलसृष्टी अन् लाल भडक पठार

राधानगरी तलावाचे पाणी कमी झाल्याने जुन्या परिसराचे अस्तित्व झाले ठळक

राजू पाटील, सकाळ वृत्तसेवा

राशिवडे बुद्रुक ता. १५ : हिरवे कंच जंगल पाहण्यात जितकी मजा असते तितकीच मजा पानगळ झालेल्या जंगलातही मिळते. भरलेला तलाव काठावर फेसाळताना पाहताना मनाला सुखद गारवा मिळतो. तोच तलाव रिता झाला की त्याचे सौंदर्य वेगळे असते. असे सौंदर्य आता दाजीपूर परिसरात राधानगरी तलावाचे खुलले आहे. सभोवती हिरवीगार जंगलसृष्टी आणि मधोमध लाल भडक पठार हे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. सत्तर वर्षांपूर्वी या पाण्यात बुडलेली गावे आता दिसू लागले आहेत आणि जुना फोंड्याचा रस्ता चालू लागला आहे.

राधानगरीच्या लक्ष्मी तलाव दोन टप्प्यात पूर्ण झाला. तत्कालीन राज्यातला नव्हे तर देशाचा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून याकडे पाहिले गेले. राजर्षी शाहू महाराज यांचे स्वप्न त्यांच्या निधनाने अर्धे राहिले. पुढे ते छत्रपती राजाराम महाराजांनी पूर्ण केले. या तलावाच्या पूर्णत्वाला सत्तर वर्षे झाली. हा तलाव पूर्ण क्षमतेने भरत असताना यात गाडलेल्या भोगावतीच्या प्रवाहाच्या दुतर्फा वसलेली गावे पुनर्वसित झाली. तलावाच्या काठावरच सभोवती ही नव्याने उभा राहिली. आजही या गावांचे अवशेष या तलावात आहेत.

सध्या हा तलाव मोकळा आहे. एरवी भरलेला तुडूंब तलाव पाहताना मन करून येते. सभोवती अभयारण्याचे हिरवीगार जंगल आणि मधोमध निळेशार पाणी. काठावर येऊन आदळताना फेसाळणाऱ्या लाटा आणि त्यात पाय सोडून बसणारे पर्यटक हा विलक्षण अनुभव असतो. सध्या हा तलाव कोरडा झालाय. दूरवर लाल भडक पठार पसरावे तसा हा तलाव दिसतो आहे. दाजीपूर, हसणे या परिसरात येणारे पर्यटक आता या पठारात उतरू लागले आहेत. त्याच्याच मधोमध जिल्ह्याला पहिल्यांदा कोकणाशी जोडणाऱ्या फोंडा मार्गाचे अस्तित्व आजही टिकून आहे. जुने ब्रिटिशकालीन धाटणीचे पूल जसेच्या तसे आहेत. यावरून जाणारा रस्ता आजही जांभ्याच्या खडकाचे अस्तित्व दाखवतो आहे.

पाण्यात बुडलेली हसणे, वलवन धनगरवाडे यांची घरे आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. घरे, घरासमोरचे अंगण, बाजूला शेती, गावाच्या मधोमध दूर कुठेतरी शेतात गेलेला रस्ता. तिथेच एखाद्या धनिकाचा पक्या विटात चुण्यामध्ये दगडाने बांधलेला चिरेबंदी वाडा. बाजूला गोलाकार विहिरीचे अस्तित्व आज दिसू लागले आहे. कोरडा तलाव डोळ्यांना रुक्ष वाटत असला तरी याचेही सौंदर्य वेगळेच आहे. इथे येणारे पर्यटक आता या गावातून फिरू लागले आहेत. एरवी डोळ्यांना गारवा देणारा भरलेला तलाव आता मोकळा असला तरी वेगळेपण जपून आहे. फक्त पाहण्याची दृष्टी हवी.
...


इथे फिरताना मात्र अरसिक पर्यटकांच्या खाणाखुणा दिसतात. काठावर येऊन दारू पिऊन फेकलेल्या बाटल्या आणि प्लास्टिक यामुळे इथे फिरताना जरा जपूनच चालावे लागते. त्याच्या स्वच्छतेकडे वन विभागाचेही लक्ष नाही हे दिसून येते.
...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com