सरवडे ह्युमन स्टोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरवडे ह्युमन स्टोरी
सरवडे ह्युमन स्टोरी

सरवडे ह्युमन स्टोरी

sakal_logo
By

3352, 03353, दोन सिंगल फोटो
....

आशीर्वादासाठीही नाही उरले पाय

माता - पित्यांचे छत्र हरपलेल्या साक्षी - श्रावणीवर कोसळले आभाळ

सरवडे, ता. १७ : दोघी बहिणींपैकी एक दहावीला, तर दुसरी बारावीला. आणखी काही वर्षांनी त्यांच्या विवाहाची बोलणी सुरू होतील; पण बोहल्यावर चढल्यावर कन्यादानावेळी त्यांनी आशीर्वाद घ्यावे असे पाय उरले नाहीत, की रक्षाबंधनाला राखी बांधावी असे हात आता त्यांच्याकडे नाहीत ... पंढरपूरच्या रस्त्यावर सगळे काळाने हिरावून नेले. आभाळच फाटले. माता - पित्याचे छत्र आणि चिमुकल्या भावाचा आधार तुटला. काळाने एवढे निष्ठुर का असावे, असे वाटणारा आजचा प्रसंग.

सरवडेतील एक हसते - खेळते कुटुंब. वडील जयवंत पोवार राधानगरीमध्ये बॉन्ड रायटर. त्या व्यवसायातून मिळतील त्या पैशावर घर संसार. साक्षी आणि श्रावणी या मोठ्या दोन मुली. एक बारावी, तर दुसरीने दहावीची परीक्षा दिलेली. धाकटा मुलगा सोहम आता नुकताच सातवीत गेलेला. वडील कामावरून आले की आई स्नेहल व वडिलांसह सर्व कुटुंब गावातून रोज फेरफटका मारायचे. आनंदी सुखी जीवनाला आज दृष्ट लागली. सुटीमुळे मुलांना पंढरपूर यात्रा करून आणूया, ही मनीषा बाळगून बाहेर पडलेल्या पोवार कुटुंबाला नियतीने आपल्या उदरात घेतले.

आज सकाळी पोवार कुटुंब हसत खेळत बाहेर पडले. आठ साडेआठच्या दरम्यान पंढरीच्या ओढीने बाहेर पडलेले हे कुटुंब निम्म्या रस्त्यावर गेले आणि अडीच तासातच काळाने गाठले. सरवडेकरांना दुःखाच्या छायेत लोटले. जयवंतच्या गाडीला अपघात झाला या धक्क्याने सारेच भांबावले. त्यांचे मित्र व कुटुंबातल्या लोकांनी मिरजेकडे धाव घेतली. कोण गेले त्याचा पत्ताही उशिरापर्यंत लागत नव्हता. अखेर यामध्ये त्या दाम्पत्यासह चिमुकला, त्यांचे नातलग अशा सहा जणांचा मृत्यू झाला, हे समजल्यावर सारेच हादरले.
या अपघाताने साक्षी आणि श्रावणी या दोघी बहिणींना मात्र निराधार बनवले आहे. उद्या हळूहळू सारेच विसरतील; पण दोघींच्या हृदयावर ही घटना कायमची कोरली आहे. उद्या लग्नाच्या बोहल्यावर चढतील, तर आशीर्वाद घ्यावेत असे आई-वडिलांचे पाय नाहीत आणि रक्षाबंधनला भाऊरायाला राखी बांधावे असे हात नसणार. दिवाळीत भाऊबीजेच्या निरांजनामध्ये आयुष्यभर चिमुकल्या भावाचा चेहरा तेवत राहणार आहे. आज त्या जखमी आहेत. त्यांच्या कानावर या अपघाताची बातमी पोचली नाही; पण जेव्हा पोहोचेल तेव्हा त्यांच्यावर आभाळ कोसळेल.
...

चौकट

माहेरवाशिणी झाल्या पोरक्या

जयवंत पोवार यांनाही सीमा, सुरेखा व कविता या तीन बहिणी. आपल्या भाऊरायाकडे प्रत्येक वर्षी त्या हक्काने ओवाळणीसाठी यायच्या. गौरीच्या माहेरवाशिणी असलेल्या त्या आता माहेरपणापासून पोरक्या झाल्या आहेत. भाऊ, भाचा आणि भावजयीच्या निघून जाण्याने त्याही पुरत्या कोसळल्या आहेत.
....

शिंदे यांचा बानगेशी ऋणानुबंध

म्हाकवे : बानगे (ता. कागल) येथील लक्ष्मण शंकर शिंदे (वय ७६) यांच्या अपघाती मृत्यूची बातमी गावात समजताच हळहळ व्यक्त करण्यात येत होती. कुटुंबाचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. शिंदे कुटुंबासह ४० वर्षांपासून सुरत येथे फूटवेअरचा व्यवसाय करतात. महिनाभरापूर्वीच ते लहान मुलगा, सून व नातवंडाबरोबर गावी आले होते. दरवर्षी ते सुटीला कुटुंबासोबत दोन महिने गावी येतात. सुटीत ते सरवडे येथील पाहुण्यांबरोबर विठुरायाच्या दर्शनाला जात होते. गावातील लहान-मोठ्यांच्या सोबत त्यांचे ऋणानुबंध होते. सुटीला गावी आल्यावर ते गावकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत होते. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.