
मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर आयकर विभाग आणि ईडीनं मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाईस सुरुवात केली होती.
Hasan Mushrif : शरद पवारांचा विश्वासू नेता अडचणीत; भल्या पहाटे मुश्रीफांच्या घरावर ED नं का टाकली धाड?
Hasan Mushrif News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालय (ED) अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा धाड टाकलीये.
हसन मुश्रीफांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल (Kolhapur Kagal) येथील घरावर ईडीनं आज पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. मुश्रीफांच्या घरावर धाड पडण्याची ही दुसरी वेळ आहे.
ईडीचे चार ते पाच अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी पोहोचल्याची माहिती आहे. दरम्यान, राज्याचं विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सुरु आहे. त्यामुळं आमदार मुश्रीफ मुंबईला होते. ते आज पहाटे कोल्हापूरला पोहोचणार असल्याची माहिती होती. दरम्यान, ही धाड का पडली? हे आपण जाणून घेऊ..
कागल तालुक्यातील संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफांच्या घरावर धाड पडली आहे. कोलकात्यातील बोगस कंपन्यांमधून 158 कोटी रुपये या कारखान्यात ट्रान्स्फर झाले होते. हा पैसा आला कुठून? ही कंपनी कुठं आहे? हा मनी लॉन्ड्रिंगचा पैसा आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
तसेच, या प्रकरणी मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर आयकर विभाग आणि ईडीनं मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाईस सुरुवात केली होती. आज पुन्हा ED नं त्यांच्या घरावर छापा टाकला आहे. त्यामुळं मुश्रीफ अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
कोण आहेत हसन मुश्रीफ?
हसन मुश्रीफ हे पश्चिम महाराष्ट्रातील बडे नेते आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते असून कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे सदस्य (आमदार) आहेत. राष्ट्रवादीचा बडा मुस्लिम चेहरा म्हणूनही मुश्रीफांची पश्चिम महाराष्ट्रात ओळख आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफांचा चांगला दबदबा आहे. हसन मुश्रीफांनी राज्याचं कामगार मंत्रिपद सांभाळलं आहे.
मुश्रीफ ईडीच्या रडारवर
2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही त्यांनी कागलमधून मोठा विजय मिळवला होता. त्यांना भाजपकडून पक्षात येण्याची ऑफरही देण्यात आली होती. मात्र, त्यांनी ती ऑफर नाकारली. राज्यातील शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी काम केलं आहे. काही दिवसांपासून साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत.