राज्यातील विधवा प्रथा बंद होणार; महाराष्ट्र सरकारने परिपत्रक केले जारी

हेरवाड पॅटर्नची होणार अंमलबजावणी
Widow
WidowSakal

मुंबई/कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर आता याच पॅटर्नची राज्यभर अंमलबजावणी करण्यात येईल. महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे, असे आवाहन करणारे परिपत्रक राज्य सरकारकडून आज जारी करण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्याच्या हेरवाड ग्रामपंचायतीने ही अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ठराव ग्रामसभेमध्ये मांडत तो मंजूरही केला होता. हेरवाडप्रमाणे राज्यातील अन्य ग्रामपंचायतीनी याचे अनुकरण करून तसा ठराव ग्रामसभेने करण्याचे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले. हेरवाड ग्रामपंचायतीने ५ मे २०२२ रोजी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला होता. पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातली जोडवी काढली जाणे, यासारख्या प्रथांचे आजही पालन केले जाते. ही अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार हेरवाड ग्राम पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर आणि सरपंच सुरगोंडा पाटील यांनी केला होता.

कोल्हापुरात आलेला महापूर आणि त्यानंतरच्या कोरोना काळात अनेकांच्या घरातील कर्ती माणसे मरण पावली होती. प्रतिकूल परिस्थितीमध्ये विधवांचा मानसन्मान कायम राहावा. सामाजिक बहिष्कारासारख्या वाईट गोष्टी संपुष्टात याव्यात म्हणून ग्रामसभेने याबाबतचा ठराव मंजूर केला होता. कोल्हापूर जिल्हा हा राजर्षी शाहू महाराजांचा म्हणून ओळखला जातो. यंदाचे वर्ष हे राजर्षींच्या स्मृतिशताब्दीचे आहे. शाहू महाराजांनी विधवांसाठी केलेल्या कार्याची जाण म्हणून या क्रांतिकारी निर्णयाचा ठराव केल्याचे सरपंच पाटील यांनी सांगितले. ही अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी महिला संघटनाही प्रयत्न करत होत्या. एखादी प्रथा बंद करण्यासाठी कायद्याचा धाक आवश्यक असतो त्यामुळे राज्य सरकारने आता हेरवाड ग्रामपंचायत ‘पॅटर्न’ सर्व राज्यात राबविण्याचे आवाहन केले आहे.

समाजातील अनेक स्तरातून अनेक अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा यांचे उच्चाटन होण्याची मागणी गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात होत आहे. प्रबोधनकार ठाकरे, महात्मा ज्योतिबा फुले, अशा अनेक समाजधुरिणांनी महिलांवरील अन्यायाच्या विरुद्ध अनेकदा क्रांतिकारी लिखाण आणि विचार समाजासमोर मांडले आहेत. एकविसाव्या शतकातही महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात महिलांना त्यांच्या पतीच्या निधनानंतर अजूनही अनिष्ट चालीरीतींना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा त्यांच्यावर केशवपन करणे, दागिने काढून घेणे, गळ्यातील मंगळसूत्र आणि कपाळावर कुंकू पुसण्याचा दुर्दैवी प्रसंग त्यांच्यावर येतो. हे सर्व महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवणारे आणि सामाजिक प्रतिष्ठा कमी करणारे आहे.’’

- डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद.

हेरवाड पॅटर्नची राज्यात अंमलबजावणी होत असल्याचे पाहून मला अभिमान वाटतो. या अनिष्ट प्रथेचे निर्मुलन होण्यासाठी यापुढे हा ठराव राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत मांडला जावा म्हणून प्रोत्साहन देण्यात येईल. लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला हा निर्णय शिव- शाहू- आंबेडकर यांच्या विचारांना बळकटी देणारा आहे.

- यशोमती ठाकूर, महिला बालकल्याण मंत्री.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com