शासकीय प्रशिक्षकाविना पैलवानांचा सराव

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दत्तक आखाड्याचे दरवाजे पुन्हा खुले झाले आहेत.
kolhapur
kolhapursakal

कोल्हापूर : भारतीय खेल प्राधिकरणाच्या मोतीबाग तालमीतील दत्तक आखाड्यात पैलवानांचा शड्डू पुन्हा घुमू लागला आहे. शासकीय प्रशिक्षक अश्विनी बोराडे यांची बदली कांदिवली येथे झाली असून, राजस्थानचे हरीश राजुरा प्रशिक्षक म्हणून अद्याप रुजू झालेले नाहीत. वस्ताद अशोक माने, विजय पाटील, महेश वरुटे पैलवानांचा सराव घेत असून, प्रशिक्षक राजुरा कधी हजर होणार याची प्रतीक्षा आहे.

कोरोनामुळे दत्तक आखाड्याला कुलूप लागले होते. पैलवानांनी गावाकडे जाऊन तिथल्या तालमीत सराव सुरू ठेवला. प्राधिकरणाने लॉकडाउननंतर ऑनलाईन सराव घेतला. तालमीतील प्रत्यक्ष व ऑनलाईन सरावात जमीन-अस्मानचे अंतर असल्याचा प्रत्यय पैलवानांना आला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दत्तक आखाड्याचे दरवाजे पुन्हा खुले झाले आहेत. आखाड्यात सध्या २३ पैलवानांचा सरावही सुरू झाला आहे.

६० पैलवानांपैकी परफॉर्मन्स चांगला नसलेल्यांचा पत्ता कट केला आहे. त्याजागी नव्या पैलवानांची भरती केली आहे. त्याचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठवला असून, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. राजुरा यांची प्रकृती ठीक नसल्याने ते हजर झाले नसल्याचे वस्ताद माने यांचे म्हणणे आहे. अजय सिंग प्रशिक्षक म्हणून यावेत, यासाठी इथल्या पैलवानांनी जोर लावल्याचे दिसत आहे.

दत्तक आखाड्यातील पैलवानांना प्रति महिना एक हजार रुपये मानधन दिले जाते. ते अल्प असले तरी पैलवान त्यावर समाधान मानून कुस्तीत नाव कमविण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतात. या स्थितीत किमान शासकीय प्रशिक्षकाने वेळेवर येऊन दीड वर्षातील सरावाची कसर भरून काढावी, अशी कुस्तीशौकिनांची अपेक्षा आहे.

''परफॉर्मन्स असेल तरच पैलवानांना आखाड्यात ठेवता येईल. अन्यथा आखाड्यावर त्यांचा भार कशासाठी ठेवायचा. त्यामुळेच कुस्तीत दिवस ढकलणाऱ्या पैलवानांना घरचा रस्ता दाखवला आहे. यात काही नामांकित पैलवानांचाही समावेश आहे. असे निर्णय घेतले तरच पैलवानांना जिंकण्याची ओढ लागेल.''

- वस्ताद अशोक माने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com