esakal | ...पोलिसांचा खबऱ्या म्हणूणच काढला काटा 
sakal

बोलून बातमी शोधा

young boy killed in ratnagiri

पोलिसाना मदत करणाऱ्याचे नेहमीच समाजात आणि खात्यात कौतुक होते. मात्र तो जर खबऱ्या असेल तर त्याच्यावर मृत्यूची टांगती तलवार असते. खबर दिल्याचे इनाम मिळो न मिळो, परंतु हे गुपित फुटले तर त्याची धडगत नसते हे नक्की. पोलिसांशी जवळीक असलेल्या अशाच रत्नागिरीतील हरहुन्नरी तरुणाला यातून आपला जीव गमवावा लागला.

...पोलिसांचा खबऱ्या म्हणूणच काढला काटा 

sakal_logo
By
राजेश शेळके

पोलिसाना मदत करणाऱ्याचे नेहमीच समाजात आणि खात्यात कौतुक होते. मात्र तो जर खबऱ्या असेल तर त्याच्यावर मृत्यूची टांगती तलवार असते. खबर दिल्याचे इनाम मिळो न मिळो, परंतु हे गुपित फुटले तर त्याची धडगत नसते हे नक्की. पोलिसांशी जवळीक असलेल्या अशाच रत्नागिरीतील हरहुन्नरी तरुणाला यातून आपला जीव गमवावा लागला. खबऱ्या असल्याचे स्पष्ट झाल्यावर पाच जणांनी एका रात्री भर बाजारपेठेत त्याला गाठून सपासप 12 वार करून त्याचा निर्घृण खून केला. फैय्याज हकीम (रा. बैलबाग) असे त्या तरुणाचे नाव आहे. तेरा वर्षांपूर्वी बाजारपेठेतील बैलबागेत त्याचा खून करण्यात आला. या खून प्रकरणातील तिघांना न्यायालयाने जन्मठेपी शिक्षा सुनावली तर दोघांची निर्दोष मुक्तता झाली. 

हे पण वाचा - निनाच्या चलाखीने हॅकर जाळ्यात

हरहुन्नरी तरुण म्हणूनच फैय्याज हकीम याची ओळख होती. राजकीय, सामाजिक अशा सर्व थरातील लोकांशी त्याचे चांगले संबंध होते. मात्र त्याचे हे संबंधच त्याला अडचणीचे ठरले. गांजाचे मोठे डिल झाले होते. सुमारे तीन ते चार पोती गांजा शहर पोलिसांनी पकडला होता. यामध्ये हात असणाऱ्यांचे या कारवाईमुळे मोठे नुकसान झाले होते. पोलिसांना याची खबर फैय्याजने दिल्याचा संशय संशयितांना होता. त्यात कॉपीराईट गुन्हा परवाना देण्यावरून आणि एका वाहनाच्या व्यवहारावररून वाद झाला होता. फैय्याज हा पोलिसांचा खबऱ्या आहे. व्यवहारात आपल्याला फसवत आहे, अशा संशयाचे खूळ सचिन जुमनाळकर, फाईक करमेळर, रफिक शेख यांच्या डोक्‍यात होते. त्या रागातून फैय्याजला संपविण्याचा त्यांनी कट रचला. अनेक दिवस ते त्याला टपकविण्याच्या प्रयत्नात होते. मात्र योग्य वेळ येत नव्हती. अखेर त्यांचा डाव साधला आणि फैय्याज हकीम याला 14 फेब्रुवारी 2007 रात्री नऊ वाजता बैलबागेत गाठले. बाजारपेठेत काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती. काहींची आवराआवर सुरू होती. एवढ्यात सचिन जुमनाळकर, फाईक करंबेळर, रफीक शेख आरोपींनी फैय्याजला आडवून त्याच्यावर खुनी हल्ला करीत सपासप 12 वार केले आणि तेथून पळून गेले. फैय्याज रक्ताच्या थारोळ्यात मदतीसाठी धडपडत होता. त्याची आतडी बाहेर आली होती. इतर सर्वांशी त्यांचे चांगले संबंध असल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या खून प्रकरणाने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. फैय्याजच्या समर्थकांनी संशयितांना शोधण्यासाठी संपूर्ण बाजारपेठ पालथी घातली. त्या संतापात अनेक ठिकाणी तोडफोड करण्यात आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तत्कालीन शहर पोलिस निरीक्षक संजय सातार्डेकर यांनी आठ ते दहा दिवसात सचिन जुमनाळकर, फाईक करमेळर, रफिक शेख या आरोपींना मुंबईत अटक केली. त्यांनी मुंबई जाण्यापूर्वी गणेश मेस्त्री, सिकिंदर उर्फ मुन्ना काझी यांच्या घरी आश्रय घेतला होता. त्यामुळे त्यांनाही आरोपी करून अटक करण्यात आली. संशयित आरोपींना कडक शासन व्हावे, यासाठी अनेकांनी सातार्डेकर यांची भेट घेतली होती. कारण फैय्याज हकीम याचे पोलिस खाते, राजकीय व्यक्ती यांच्याशी चांगले संबंध होते. सातार्डेकर यांनी या प्रकरणी ठोस पुरावे तयार करून खटला अधिक मजबूत बनविला होता. त्यामुळे आरोपींना कडक शासन होण्याची दाट शक्‍यता होती. फैय्याज हा पोलिसांचा खबऱ्या आहे. कॉपीराईट गुन्ह्याचा परवाना देण्यावरून आणि टाटा सुमो गाडीच्या खरेदी विक्रीवरून झालेल्या वादातून त्याचा खून झाल्याचे पोलिस तपासात पुढे आले. 

हे पण वाचा - विषय हार्ड तर ; उडव की मग हवेत बार... 

वर्षभर या खटल्याचे काम सुरू होते. सरकारपक्षातर्फे सत्तावीस साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यातील चार साक्षीदार फितूर झाले. तरीही न्यायालयासमोर या तिघांनी खून केल्याचा आणि खुनाचा कट रचल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने तिघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सिकंदर काझी यांनी आरोपींना पळून जाण्यास मदत केली आणि गणेश मेस्त्रीने मुंबईत आश्रय दिला म्हणून त्यांनाही आरोपी करण्यात आले होते. मात्र त्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. 

हे पण वाचा - गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना मिळालीय ही नविन जबाबदारीत...