कोल्हापुरी चप्पलच्या मार्केटवर 'याचा" परिणाम (व्हिडिओ)

Kolhapuri Chappal Market Affected Due to Heavy Rains
Kolhapuri Chappal Market Affected Due to Heavy Rains

कोल्हापूर - कोल्हापुरी चप्पल परदेशवासीयांच्या मनावर कोरला गेलेला ब्रॅंड. पर्यटनाच्या निमित्ताने कोल्हापुरी चप्पलची खरेदी हा त्याला चढलेला साज आहे. लाल गोंडा, नक्षीदार कलाकुसर आणि डोळ्यांना मिळणारा गारवा हे या चपलांचे वैशिष्ट्य. यंदाच्या पावसाच्या वाढलेल्या हंगामामुळे चपलांना अक्षरश: बुरशी चढली आहे. त्यामुळे विक्रेत्यांच्या पोटात गोळा आला असून, विक्री ठप्प झाल्याचे चित्र आहे.

गणेशोत्सव, दसरा, दिवाळीवेळी पर्यटकांचा ओघ कोल्हापूरकडे वाढतो. चप्पल मार्केट ग्राहकांनी फुलून जाते. यंदा कोल्हापुरात महापुराने थैमान घातले. याचा उत्पादनावर परिणाम झाला. पुरात चपलांच्या कच्च्या मालाचे बरेच नुकसान झाले. सध्या पावसाचे वातावरण कायम असल्याने कोल्हापुरी चपलांना बुरशी लागण्याचे प्रमाण वाढल्याने विक्रीत घट झाली आहे.
जिल्ह्यातील कागल, कापशी, बाजार भोगाव, लिंगनूर येथील कारागिरांचे संसार या व्यवसायावर आधारलेले आहेत; परंतु या गावांनाच पुराचा फटका बसल्याने तेथील चप्पलनिर्मितीवर परिणाम झाला आहे.

जिल्ह्यातील या चपला कारागिरांची महिनाभराची उलाढाल दोन कोटींवर होती. पूरस्थिती ओसरल्यानंतर व्यवसायाने परत उभारी घेण्याचा प्रयत्न केला; परंतु दिवाळी संपली तरी पाऊस व हवेतील आर्द्रता कायम असल्याने त्याचा परिणाम चप्पलनिर्मितीवर होत आहे. उन्हाचे प्रमाण नसल्याने चपलांचे फिनिशिंग व्यवस्थित होत नाही. मागणी घटल्याने अनेक कारागीर अस्वस्थ आहेत.

शहरात जवळपास कोल्हापुरी चपलांची अडीचशे दुकाने आहेत. महिन्याकाठी दीड कोटींची उलाढाल होण्याची प्रक्रिया सध्याच्या या वातावरणामुळे वीस ते पंचवीस लाखांवर येऊन ठेपली आहे. पाऊस अजूनही कायम असल्याने चप्पल वापरण्यास सोयीस्कर नसल्याने ग्राहक पाठ फिरवत आहेत.

कोल्हापुरात तयार होणारा माल हैदराबाद, मुंबई, जयपूर, लखनौ, दिल्लीचे व्यावसायिक खरेदी करतात; परंतु ९० टक्के खरेदीदारांची मागणी घटल्याने व पाठवलेल्या मालाला बुरशी चढल्याने खरेदीदारांनी तो परत पाठविला आहे. हीच स्थिती राहिल्यास कोट्यवधीचा फटका सोसावा लागणार असल्याचे व्यावसायिकांमधून सांगण्यात येत आहे.

पूरस्थितीमुळे बरेच नुकसान झाले. त्यातून सावरण्याचा प्रयत्न चप्पल विक्रेते करीत आहेत; परंतु पाऊस लांबल्याने ग्राहक चप्पल खरेदीसाठी येत नाहीत.
- भूपाल शेटे, 

कोल्हापुरी चप्पल विक्रेते

दिवाळी संपली तरी वातावरणात ओलावा आहे. हवेत आर्द्रता असल्याने चपलांचे फिनिशिंग नीटपणे होत नाही. चपलांना बुरशी चढल्याने खरेदीदार माल परत पाठवत आहेत. या मालाचे करायचे काय हा प्रश्न आहे.
- बाळकृष्ण गवळी, 

कोल्हापुरी चप्पल कारागीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com