कोल्हापुरी कुंभारमामाच्या हलगी वादनाचा ठेका दिल्लीकरांच्या ही हृदयात कायमचा ठसलाय!

संदीप खांडेकर
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

बावीस वर्षांपूर्वी ‘कोल्हापुरी साद हलगीचा’ नावाने मामांच्या हलगीवादनाची ऑडिओ कॅसेट बाजारात आली. ध्वनिक्षेपकावर हलगीचा कडकडाट चांगलाच घुमला. कुंभाराच्या हाताने वाजवलेला हलगीचा ठेका ‘जगात भारी आम्ही कोल्हापुरी’ची ओळख ठळक करणारा ठरलाय. 

कोल्हापूर - मामा ऊर्फ अनिल बंडोपंत वागवेकर हलगी वाजवण्यात फक्कड गडी. घरचा व्यवसाय शाडूच्या गणेशमूर्तींना आकार देण्याचा. शेणगावच्या हलगीवादकाच्या सोबतीत वडील हलगीत तरबेज झाले. त्यांचा वारसा अनिल वागवेकर यांच्याकडे आला. बावीस वर्षांपूर्वी ‘कोल्हापुरी साद हलगीचा’ नावाने मामांच्या हलगीवादनाची ऑडिओ कॅसेट बाजारात आली. ध्वनिक्षेपकावर हलगीचा कडकडाट चांगलाच घुमला. कुंभाराच्या हाताने वाजवलेला हलगीचा ठेका ‘जगात भारी आम्ही कोल्हापुरी’ची ओळख ठळक करणारा ठरलाय. 

आर. के. स्टुडिओतुन हलगी परतली

पापाची तिकटीवर बंडोपंत वागवेकरांचं घर. त्यांच्या अंगातील कसब मुलग्यात उतरलं. मामा अर्थात अनिलरावांनी दुधाळीतल्या महाराणा प्रताप हायस्कूलमधून दहावी सुटले. वयाच्या पाचव्या वर्षीच त्यांनी वडिलांच्या बोटाला पकडलं. हलगीवर वाजणारी डाव्या हातातील काठी पाच इंच. उजव्या हातातील सात इंच. दोन्हींचा समन्वय साधून चामड्यावर बोल काढण्यात मामांनी कमाल केली. बंडोपंतांचा ढोलगी, हलगीत बोलबाला होताच. मामांच्या कर्तृत्वाने त्याला साज चढविला. आर. के. स्टुडिओत हलगी वादनासाठी बंडोपंतांना बोलावणं होतं. हाय-फाय स्टुडिओचं रूप त्यांच्या डोळ्यांना सहन झालं नाही. हलगीवादनाच्या संधीला बगल देत स्वारी कोल्हापूरला परतली. एस. विठ्ठलांच्या पथकात त्यांचा राबता होता.

डबल ठेक्‍यातील मामांची नजाकत भारी

बंडोपंतांचं १९९० मध्ये निधन झाल्यावर मामांचा खांदा घरच्या जबाबदारीने झुकला. शाडूच्या गणेशमूर्ती तयार करण्यात हात गुंतला. गणेशोत्सवात शंभर-दीडशे मूर्ती तयार करण्याचं टार्गेट होतं. सुरळी, पट्टा घाई, सिंगल ठेका, डबल ठेक्‍यातील मामांची नजाकत भारी. दिल्ली, कोल्हापूर, मुंबई, पुणेकरांच्या हृदयात त्यांच्या हलगीचा ठेका कायमचा ठसलाय.

हे ही वाचा - चक्क... बत्तीस सेकंदांत फेटा बांधणारा कोल्हापुरी तरुण
 

गणेशमूर्ती घडविण्यात ही मामा मास्टर

मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांवेळी हलगीवादनासाठी मामांना सुपारीचा मान दिला जात आहे. गणेशमूर्ती घडविण्यात मामा मास्टर. त्यांच्या हातात रंगकाम उपजतच उतरले आहे. दरवर्षी मूर्तींना रंगवण्याचं बैतं मामांकडेच आहे. आई पार्वती यांच्याकडे मूर्तींना योग्य दर देण्यातले व्यवहारज्ञान बिनचूक आहे. बेताच्या परिस्थितीत पोटापुरतं कमावण्याची लढाई मोठी होती. हलगीवादनातल्या मानधनाच्या बचतीचा मामांचा फंडा यशस्वी ठरला. तसंच त्यांनी हलगीवादनात डोकं चालवून नव्या चालींत हात पक्का केला.

हे पण पहा - गियरची भानगड आली लक्षात अन् अडाणी बाबा झाले उत्कृष्ठ मेस्त्री... 
 

हलगीवादनाची कला जिवंत राहण्यासाठी मामा प्रयत्नशील

कैताळ व घुमक्‍याच्या सोबतीला सनईचा सूर मिसळला. त्याचं कैकजणांना अप्रूप वाटलं. कुंभाराच्या हातात हलगीचं कौशल्य कसं आलं, या विचाराने अनेकांच्या भुवयाही उंचावल्या. मामा कलेशी प्रामाणिक राहिल्यानं त्यांना या चर्चेशी देणं-घेणं कधीच राहिले नाही. लग्नानंतरही मामांचा हात मूर्तीसह हलगीवर सफाईदारपणे चालत आहे. मामांची पत्नी आरती यांनाही मूर्ती बनविण्यात समाधान मिळते. मुलगा अभिजितने मामांच्या पावलावर पाऊल ठेवलंय. शहाजी छत्रपती महाविद्यालयात त्याचं बी. कॉम. शिक्षण सुरू आहे. मामांच्या कडाडणाऱ्या हलगीत कैताळ वाजवणं त्यांन थांबवलेले नाही. सलग एक तास हलगीवादन करण्यानंही मामांचा हात थकत नाही. वडिलांकडून वारसाहक्काने मिळालेली हलगी मात्र बदललेली नाही. हलगीला तड गेल्यावर लोखंडी कड्यावर नवं चामडं चढवून, ती दणकेबाज वाजवली जाते. हलगीवादनाची कला जिवंत राहण्यासाठी मामा प्रयत्नशील आहेत. त्यासाठीच ते हलगीवादनाच्या स्पर्धा भरविण्यात पुढे आहेत.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapuri Halagi Master Kumbhar Mama