कोल्हापूरची चटकदार मिसळ मतदानादिवशी मिळणार डिस्काऊंटमध्ये (व्हिडिओ)

अर्चना बनगे
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

- मतदानादिवशी मिळणार मिसळ डिस्काऊंटमध्ये

कोल्हापूर : कोल्हापूर आणि कोल्हापुरी मिसळ याचे नाते अनोखे आहे. कोल्हापूरमध्ये विधानसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर मिसळप्रेमींना मिसळ खाण्याची मोठी संधी मिळणार आहे. मतदान करून आल्यानंतर बोटाची शाई दाखवली की ही मिसळ सवलतीच्या दरात खाण्याची संधी मिसळ प्रेमींना मिळणार आहे.
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान महत्त्वाचे असते.

प्रत्येकाने मतदान करावे, मतदाराची संख्या वाढावी यासाठी प्रशासन, माध्यमे प्रयत्न करत असतातच मात्र यासाठी आता कोल्हापुरातील खाद्य विक्रेते पुढे आले आहेत. कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी चप्पलबरोबरच कोल्हापुरी मिसळ देखील खूप प्रसिद्ध आहे.

झणझणीत कटाची मिसळ, दही ,कांदा ,लिंबू आणि सोबत पाव असं समीकरण आहे. लक्ष्मी मिसळ सेंटरचा युवक अमोल गुरव याने हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कोल्हापूरकरांना सवलतीच्या दरात मिसळ खायला देऊन व्होटिंग करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे.

कोल्हापूरमध्ये मिसळ खाणाऱ्यांची संख्या खूप आहे. यामध्ये मतदान करून आल्यानंतर कोणासोबत तरी मिसळ खाण्याची मजा वेगळीच आहे आणि तेही डिस्काउंटमध्ये या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे आम्ही मतदानादिवशी मतदान केल्यानंतर सगळ्या मैत्रिणी या ठिकाणी येऊन मिसळ खाण्याचा आनंद घेणार आहोत, अशी माहिती मयुरी इंगवले यांनी दिली.

मिसळमध्ये डिस्काउंट हा सामाजिक उपक्रम खूपच चांगला आहे. यामुळे गेल्या लोकसभा मतदार यादीमध्ये फर्स्ट वोटरची संख्या वाढली होती आणि सोशल मीडियावर असणाऱ्या युवकांना मिसळ तर पर्वणीच असणार आहे. त्यामुळे माझ्या मित्रांना मतदान केल्यानंतर मिसळ खाण्यासाठी घेऊन येणार आहे, असे शुभम वारकर यांनी सांगितले.

कोल्हापूरमध्ये मिसळ प्रेमी खूप आहेत. त्यामुळे  लोकसभा निवडणुकीवेळी मी हा उपक्रम  सुरू केला. यामध्ये नव मतदार पुढे यावेत हा प्रयत्न आहे. विधानसभेवेळी देखील कोल्हापूरकर मोठ्या संख्येने पुढे येतील, असा मला विश्वास आहे.

- अमोल गुरव, मिसळ विक्रेता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapuri Misal will get on Discounted rates in Kolhapur