चक्क... डोक्‍याने नारळ फोडणारे हे कोल्हापुरी राॅकेट आण्णा...

संदीप खांडेकर
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

‘गाव करील ते राव करील का,’ अशी म्हण आहे. याउलट ‘राव करील ते गाव करील का,’ अशी म्हण शंकर अण्णांमुळे गावात चर्चेत आली आहे. 

कोल्हापूर - हाताच्या एका दणक्‍यात दगडावर नारळ फोडणं जमेलच असं नाही. डोक्‍याने फोडण्याची करामत कोणी करणारही नाही. शंकर तुकाराम पाटील यांचं डोकं दगडाहून कठीण. आजवर हजारो नारळांची बखलं त्यांच्या डोक्‍यानं केली आहेत. बाबू गोंधळींच्या पावलावर पाऊल टाकण्याचं साहस रॉकेट ऊर्फ शंकर पाटील यांना पुरेपूर जमलं. गावातील बलभीम तालीम मंडळाच्या दारात त्यांच्या डोक्‍यानं पहिला नारळ फोडला. वयाच्या एकोणसत्तरीत डोक्‍यानं नारळ फोडण्याच्या सत्राला पूर्णविराम मिळालेला नाही. ‘गाव करील ते राव करील का,’ अशी म्हण आहे. याउलट ‘राव करील ते गाव करील का,’ अशी म्हण शंकर अण्णांमुळे गावात चर्चेत आली आहे. 

सरावानं डोकंच झालं दगडासारखं

पंचेचाळीस वर्षांपूर्वी टोप-संभापूरचे बाबू गोंधळी एका कार्यक्रमात डोक्‍याने नारळ फोडत होते. अण्णांच्या डोळ्यात त्यांचं कसब रुतलं. बाबूला जमतंय मला का नाही जमणार.., असा अण्णांचा ईर्ष्येखोर स्वभाव. गावच्या तालमीत डोक्‍यानं नारळ फोडण्याचे धाडस अण्णांनी केले. पहिल्या प्रयत्नातल्या यशानं अण्णांचे हात आभाळाला टेकले. दहा-पंधरा नारळ फोडताना त्यांचं डोकं सुरवातीला हाललं. पुढं सरावानं डोकंच दगडासारखं झालं. गावा-गावांतल्या जत्रा, कुस्ती मैदानं, वरातीत अण्णांच्या डोक्‍यावर नारळ फुटत राहिले. त्यांच्या नावाला पब्लिसिटी मिळत गेली. त्यांच्या अजब धाडसाने अनेकांनी सुपारी देण्यासाठी त्यांच्या गावाचा शोध घेणे सुरू केले.

हेही वाचा - कोल्हापुरी कुंभारमामाच्या हलगी वादनाचा ठेका दिल्लीकरांच्या ही हृदयात कायमचा ठसलाय!

अण्णां रॉकेट इंजिनिअरिंगमध्ये फिटर

करवीर तालुक्‍यातले नंदवाळ अण्णांचे गाव. वाशीच्या विद्यामंदिरातनं सातवी पास झाल्यावर त्यांचे तीन एकर शेतीत राबणे सुरू झाले. आई-वडील, दोन भाऊ, दोन बहिणी असा त्यांचा मोठा परिवार. शेतात घाम गाळल्याशिवाय चूल पेटणं शक्‍य नव्हते. अण्णांना रॉकेट इंजिनिअरिंगमध्ये फिटरची नोकरी लागल्यावर कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळाले. भाऊ जोती, आनंदा, बहीण शांता व हौसा यांच्या साथीने घरात सुख अवतरले. शेतीचा तुकडा वाढत जाऊन सहा एकर झाला. गावागावात जाऊन नारळ फोडण्याचेा अण्णांचा उपक्रम मात्र थांबला नाही. दिल्ली, कोल्हापूर, मुंबई, पुणे, ठाणे, चेन्नई, म्हैसूर, बंगळूर, गोवा, बेळगाव, परभणीतही अण्णांच्या नावाचा बोलबाला झाला. अण्णांच्या डोक्‍याने नारळ फोडण्याच्या धाडसापुढे अनेकांनी डोळे मिटलेही. नारळाच्या बखलांवर टाळ्यांचा कडकडाट करण्यास ते विसरले नाहीत. आजही कुस्ती मैदानात अण्णांची हजेरी असते. बक्षिसासाठी अण्णांचा हात कधीच पुढे नसतो. भारावून गेलेलेच अण्णांच्या खिशात बळजबरीने बक्षीस घालतात.

हेही ही वाचा- चक्क... बत्तीस सेकंदांत फेटा बांधणारा कोल्हापुरी तरुण

डोक्यावर वर नारळ फोडण्याचा नाद काय सुटला नाही

अण्णांच्या म्हणण्यानुसार आजवर पाच हजारांवर नारळ डोक्‍यावर फुटले आहेत. ‘रॉकेट’ म्हणूनही त्यांची गावच्या पंचक्रोशीत ओळख आहे. बत्तीस वर्षांच्या नोकरीतून त्यांनी वेळ काढून नारळ फोडण्याचा उपक्रम सुरू ठेवलाय. सेवानिवृत्त झाल्यावर अण्णांचे धाडस थांबेल, अशी अनेकांच्या तोंडात चर्चा होती. साठी उलटूनही डोक्‍याची टणकता अण्णांनी दाखवल्याने चर्चेची तोंडं शिवली गेली. त्यांचा मुलगा नाना पीडब्ल्यूडीत कामाला आहे. दुसरा मुलगा अजित शेतीकामात आहे. अण्णांनी त्याला ट्रॅक्‍टर घेऊन दिला आहे. ऊस, भुईमूग, सोयाबीनच्या वावरात अण्णांचा फेरफटका असतो. त्यांच्या अजब वेडापायी नवी पिढी चकित झाल्याशिवाय राहत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Kolhapuri rocket Anna Coconut crackers on head