कोल्हापूर जिल्ह्यातील 4 हजार 120 जनावरांचे स्थलांतर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे पशुधनही बाधित झाले आहे. जिल्ह्यामधील पाच तालुक्यातील 4 हजार 120 जनावरांचे तात्पुरत्या उघडण्यात आलेल्या छावण्यांमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे पशुधनही बाधित झाले आहे. जिल्ह्यामधील पाच तालुक्यातील 4 हजार 120 जनावरांचे तात्पुरत्या उघडण्यात आलेल्या छावण्यांमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. तर 5 हजार जनावरे ही त्या-त्या पशुपालकांच्या नातेवाईकांकडे विस्थापित केल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी दिली. या पशुधनाची काळजी घेण्याचे पशुसंवर्धन विभागाने सुरु केले असून, छावण्यांमध्ये व अन्य ठिकाणी विस्थापित झालेल्या पशुधनास आवश्यक औषधोपचार, लसीकरणास प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापुरात माणसांबरोबरच मुक्या जनावरांचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार महापुरामुळे शंभरहून अधिक लहानमोठी जनावरे दगावली असून सहा हजाराच्या आसपास कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. पुरामुळे वाहून गेलेल्या जनावरांची माहिती संकलीत करण्याचे कामही सुरु आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत सुमारे शंभरहून अधिक डॉक्टरांच्या मदतीने औषधोपचार आणि लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पुराच्या काळात जनावरांमध्ये उदभवणाऱ्या प्रामुख्याने फऱ्या आणि घटसर्प या रोगाचा प्रतिबंध करणाऱ्या लसींची पुरेशी मात्रा असून भविष्यात या संसर्गजन्य आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी आणखीन 2 लाख लसींची मागणी नोंदविली आहे.

महापुरामुळे बाधित गावातील जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले असून, पाच तालुक्यातील 25 गावांमधील जवळपास चार हजार 120 जनावरांसाठी पशुसंवर्धन विभाग आणि स्वयंसेवी- सेवाभावी संस्था-संघटनाच्या सहकार्यातून छावण्या उघडल्या आहेत. यामध्ये कागल तालुक्यातील 3 गावांमधील 220 जनावरे,हातकणंगले तालुक्यातील 5 गावांमधील 650 जनावरे, शिरोळ तालुक्यातील 5 गावांमधील 850 जनावरे, करवीर तालुक्यातील तालुक्यातील 2 गावांमधील 400 जनावरे आणि गडहिंग्जल तालुक्यातील 10 गावांमधील जवळपास दोन हजार जनावरांचा समावेश आहे.

पुरहानीमुळे जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 22 गावातील पाच हजाराहून अधिक पशुधन विस्थापित झाले असून यामध्ये शिरोळ तालुक्यातील 13 गावांतील 3320,हातकणंगले तालुक्यातील 2 गावातील 300, भुदरगड तालुक्यातील 3 गावांतील 210, राधानगरी तालुक्यातील एका गावांतील 40, पन्हाळा तालुक्यातील एका गावांतील 100, करवीर तालुक्यातील 2 गावांतील 1050 पशुधनाचा समावेश आहे.

पूरबाधित जनावरांच्या छावण्याच्या ठिकाणी एका डॉक्टराचे पथक तैनात केले असून, पूरबाधित गावांसाठी विषेश वैद्यकीय पथके स्थापन करुन जवळपास शंभर ते सव्वाशे डॉक्टर्स आणि स्टाफ तसेच जिल्ह्यातील स्वयंसेवी- सेवाभावी संस्था-संघटनाबरोबरच खाजगी पशु वैद्यकीय अधिकारीही सक्रीय झाले आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पुण्याहून दोन पथके दाखल झाली असून, ती शिरोळ परिसरात कार्यरत आहेत. याशिवाय पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जवळपास 12 विशेष पथकेही कार्यरत आहेत.

जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांची टीम कार्यरत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapurs 4 thousand 120 animals have been Shifted to Temporary Camp