‘गोकुळ’ला ३४ प्रश्‍नांचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - जिल्हा दूध संघातील (गोकुळ) पन्नास कोटीहून अधिक रकमेचा आर्थिक गैरवापर व अपव्ययासंबंधी आमदार सतेज पाटील यांनी ३४ प्रश्‍नांद्वारे लक्ष वेधले आहे. संघाची २०१६-१७ ची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. १५) होत आहे. 

कोल्हापूर - जिल्हा दूध संघातील (गोकुळ) पन्नास कोटीहून अधिक रकमेचा आर्थिक गैरवापर व अपव्ययासंबंधी आमदार सतेज पाटील यांनी ३४ प्रश्‍नांद्वारे लक्ष वेधले आहे. संघाची २०१६-१७ ची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. १५) होत आहे. 

बल्क कुलर आरंभी शिल्लक १ कोटी ३६ लाख ९४ हजार ४३९ रुपये असताना त्याचा वापर न करता नवीन बल्क कुलर दोन कोटी ७२ लाख ३ हजार ४४६ रुपयांना खरेदीचे कारण काय? अनुदानित बल्क कुलर किती शिल्लक आहेत? त्याची किंमत किती? त्याचा वापर झाला का? जिल्ह्याबाहेर किंवा राज्याबाहेर किती बल्क कुलर बसविले आहेत? त्यासाठी शासनाच्या दुग्ध विभागाची परवानगी घेतली आहे का? त्यासाठी एकूण खर्च किती आणि त्यास वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजुरी आहे का? जे युनिट उभारणार आहात, त्यासंबंधी करार झाला आहे का? त्या करारातील अटी कोणत्या? संघाची चालू मालमत्ता १३७ कोटी ३६ लाख २९ हजार ३९५ रुपये तर कायम मालमत्ता १२८ कोटी ९९ लाख ७२ हजार ५३६ रुपये इतकी दाखविली आहे. चालू मालमत्तेची सविस्तर यादी या अहवालात दाखविण्यात आलेली नाही. चालू खात्यावर ५४ कोटी ३ लाख ६४ हजार ४१८ इतकी रक्कम आहे. यूथ डेव्हलपमेंट बॅंक, पार्श्‍वनाथ बॅंक, वीरशैव बॅंक या बॅंकांतील खात्यावर दाखविली गेली आहे. या बॅंकांचा गेल्या तीन वर्षांत ऑडिट वर्ग कोणता आहे? 

त्यांचा नेट एन.पी.ए. शून्य टक्के आहे का? या बॅंका आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने योग्य आहेत का? सहकार कायदा कलम ७७ चे उल्लंघन होणार नाही, याची काळजी संचालक मंडळाने घेतली आहे का? गोकुळ शॉपीमध्ये किती रकमेचा अपहार झाला आहे? शॉपीचे व्यवस्थापन संघाकडे आहे की भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. संचालक मंडळाने अपहारप्रकरणी कोणती कारवाई केली? अपहाराची रक्कम व्याजासह वसूल करण्यात आली आहे का? संघातील नोकरभरतीसाठी कोणते निकष लावले आहेत? भरतीस शासनाची मान्यता आहे का?

महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यामार्फत संस्थांना पुरविलेल्या पशुखाद्याची मार्चअखेरची येणे बाकी किती आहे? वसुलीबाबत कोणती कार्यवाही केली आहे? पशुखाद्य विक्री येणे व देणे स्वतंत्रपणे का दाखविण्यात आलेले नाही?

महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यामध्ये १८२ कोटी ८७ लाख २४ हजार २९२ व या मार्चअखेर २३० कोटी ७२ लाख २५ हजार इतकी उलाढाल नाममात्र दिसते. नफा तोटा पत्रकात वेगळी रक्कम दाखविली गेली आहे. व्याज, एनडीडीबी व मुख्यालयावरील खर्चाच्या आकडेवारीची तुलना करता आठ कोटी ४३ लाख ५ हजार ५२३ रुपयांची वाढ दिसते. सात कोटीहून अधिक रकमेच्या जाहिरातीवर खर्च झाला आहे, त्यास सहकार विभागाची मान्यता आहे का?

संचालक मंडळाचा प्रवास खर्च २० लाख मंजूर असताना तो २१ लाख ९९ हजार ६०६ रुपये इतका झाला आहे. वाढीव खर्चाचे कारण काय?

गोकुळ प्रकल्प विस्तारीकरणासाठी ९४ कोटी ६५ लाखांची गूंतवणूक होणार आहे. प्रकल्पाचे मूळ इस्टिमेट किती व त्यास कोणत्या वर्षी मंजुरी घेतली आहे? इस्टिमेटच्या किती टक्के रक्कम संघ सहभागातून गुंतवणार आहे?

वैरण विकास योजनेत सभासदांसाठी चापकटर आदी खरेदी करताना संघ निविदा मागवते का? निविदाधारकाकडून किती रकमेचे चाप कटर खरेदी केले आहेत. भविष्यकालीन निधी योजनेसाठी ३६ कोटी ५८ लाख ३६ हजार इतकी रक्कम दाखविली गेली आहे. याबाबत माहिती मिळावी.

दूध पुरवठा संस्थांना दिल्या जाणाऱ्या ॲनालायझर मशीनची किंमत वेगवेगळी आहे. मशीन खरेदीसाठी संघाने किती अनुदान दिले आहे? गोकुळ शिरगाव, नवी मुंबई (वाशी) व पुणे येथे संघाच्या मालकीचे टॅंकर्स वगळता उर्वरित शंभर टॅंकर भाड्याने घेत असताना त्याची जाहिरात दैनिकांत दिली का? अटींचे पालन करून निविदा मंजूर केली का? संघाने किती अंतर्गत अथवा वैधानिक लेखापरीक्षण करून घेतले आहे? या वर्षासाठी किती लेखापरीक्षकांकडून अर्ज मागविले?

संघाने लिटरच्या हाताळणी खर्चाची रक्कम ३८.९४ कोटी इतकी दाखविली गेली आहे. यात प्रति दिवशी दुधाच्या हाताळणीत वाढ झाल्याचे स्पष्ट होते. त्याचा फायदा दूध उत्पादक व दूध संस्थाना का दिला जात नाही?

तिसंगी येथे भेसळीचा प्रकार उघडकीस आला. त्यावर कोणती कारवाई झाली? संघाने ९२ कोटी ७१ लाख दूध फरक संस्थांच्या खात्यावर वर्ग केला आहे का?

सीमाभागातील दूध उत्पादकांना प्रति लिटर दोन रुपयांनी दर कमी देण्यामागे कारण काय? कार्यक्षेत्राबाहेर ९२ लाख ६१ हजार लिटर दूध खरेदी केले आहे. प्रति लिटर खर्च स्थिर राहण्यास मदत होत असताना दर कमी का दिला जातो?

मुंबईचे दूध वितरक इतर संघाचे दूध विकतात. त्यांच्यावर कोणती कारवाई केली? वार्षिक सभा दुपारी एकऐवजी सकाळी अकरा वाजता का बोलविली? जास्तीत जास्त सभासद उपस्थित राहू नयेत असा यामागे हेतू आहे का?

संघाच्या मुख्यालयाकडे २४०० रुपये इतकी रोख शिल्लक आहे. त्याच वेळी मुंबई शाखेकडे तीन कोटी ३१ लाख इतकी मोठी रक्कम ठेवण्याचा उद्देश काय? वाहनांची दुरुस्ती, डिझेल, पेट्रोल, टायर ट्यूबचा वार्षिक खर्च ९८ लाख ४० हजार असताना वाहन भाड्यापोटी दोन कोटी १६ लाखांचा खर्च करण्यामागे कारण काय?

रक्कमेचा नाही वापर
बॅंकेतील शिल्लक रक्कम ५४ कोटी ३ लाख ६४ हजार ४१८ रुपये दाखविली आहे. यात यूथ बॅंकेमध्ये ९ कोटी ७६ लाख २० हजार ८५ रुपये बिनव्याजी पडून आहेत. नुकसानीस जबाबदार कोण? ठराविक बॅंकांमध्ये मोठी रक्कम वापर न करता वर्षभर ठेवण्याचा संचालक मंडळाचा उद्देश काय?

Web Title: kolhpur news gokul milk