खासदारकीचा आता काय तो फैसलाच - आमदार मुश्रीफ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांना आमदार हाळवणकर यांनी मंत्री करतो, भारतीय जनता पक्षात या, असे सांगितले. मात्र, गेले सहा महिने नारायण राणे मंत्रिपदाची वाट पाहत आहेत; पण आमचा गडी मात्र हुशार आहे.

- हसन मुश्रीफ, आमदार

मुरगूड - आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांना आमदार हाळवणकर यांनी मंत्री करतो, भारतीय जनता पक्षात या, असे सांगितले. मात्र, गेले सहा महिने नारायण राणे मंत्रिपदाची वाट पाहत आहेत; पण आमचा गडी मात्र हुशार आहे. आमचे त्यांच्याशी मतभेद का आहेत? तर ज्या ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांनी त्यांना रक्ताचं पाणी आणि हाडाची काडं करून निवडून आणलं, याची जाण त्यांना नाही. ते महापालिकेत वेगळी भूमिका घेतात. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी सदस्यांना घेऊन आलेल्या मोटारीचे ते चालकच झाले. काय करतील आमचे कार्यकर्ते? आता काय व्हायचा तो फैसला होईल, असे आव्हानच आमदार मुश्रीफ यांनी खासदार धनंजय महाडिक यांना नाव न घेता दिले. येथे ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील अध्यक्षस्थानी होते. शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील, भय्या माने, नाविद मुश्रीफ, जिल्हा परिषदेचे सदस्य मनोजकुमार फराकटे, ‘बिद्री’चे संचालक गणपतराव फराकटे, जगदीश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

आमदार मुश्रीफ म्हणाले, की विधानसभेचे रणांगण अजून लांब आहे. निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी, हे माहीत नाही; पण आमचा पहिलवान आतापासूनच उठाबशा काढत आहे. असे सांगून समरजितसिंह घाटगे यांचे नाव न घेता ते म्हणाले, ‘‘आमची ३०-३५ वर्षे यातच गेली. या काळात मी कागलमध्ये असताना सकाळी सहाला स्वत: दार उघडले नाही, असा एकही दिवस नाही. यामुळे शाहूंच्या विचारांचे खरे वारस आम्हीच आहोत.’’

प्रवीणसिंह पाटील म्हणाले, ‘‘आमदार मुश्रीफ जनतेचे नेते आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.’’ भय्या माने, डी. डी. चौगले, शिवानंद माळी, सरपंच शीतल फराकटे यांची भाषणे झाली.

समरजितसिंह घाटगे व संजय घाटगे गटातून मुश्रीफ गटात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार झाला. विकास पाटील यांनी स्वागत केले. विशाल बेलवळेकर यांनी सूत्रसंचालन  केले. रणजित सूर्यवंशी यांनी आभार मानले.
मेळाव्यास डी. डी. चौगले, शामराव पाटील, रंगराव पाटील, पंचायत समितीचे सदस्य जोती मुसळे, दत्ता पाटील, सुभाष चौगले, धोंडिराम चौगले, सूर्याजी घोरपडे, नीलेश शिंदे, एम. एस. पाटील, आबा खराडे, शामराव घाटगे, नगरसेवक रविराज पाटील, अमित तोरसे, मंतेश पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Kolhpur News Hasan Mushrif comment