घरासाठी घर, जमिनीसाठी एफएसआय

सुनील पाटील
मंगळवार, 12 जून 2018

कोल्हापूर - हद्दवाढीसाठी पर्याय असणाऱ्या गावांमध्ये ३२ किलोमीटरचे रस्ते केले जाणार आहेत; मात्र या रस्त्यांमध्ये ज्यांचे घर जाईल त्यांना घर आणि जमीन जाईल त्यांना तेवढ्याच जमिनीचा मोबदला किंवा महापालिकेप्रमाणे एफएसआय दिला जाणार आहे.

कोल्हापूर - हद्दवाढीसाठी पर्याय असणाऱ्या गावांमध्ये ३२ किलोमीटरचे रस्ते केले जाणार आहेत; मात्र या रस्त्यांमध्ये ज्यांचे घर जाईल त्यांना घर आणि जमीन जाईल त्यांना तेवढ्याच जमिनीचा मोबदला किंवा महापालिकेप्रमाणे एफएसआय दिला जाणार आहे. कोल्हापूर नागरी क्षेत्र प्राधिकरणाने ४२ गावांसाठी ही तयारी दर्शवली आहे. एफ.एस.आय. म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्‍स. याला चटईक्षेत्र निर्देशांक असे म्हणतात.

कोल्हापूर शहर हद्दवाढ व्हावी आणि होऊ नये म्हणणाऱ्यांकडून हद्दवाढीऐवजी प्राधिकरणाचा पर्याय स्वीकारला. यामध्ये ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच सदस्यांचे हक्क अबाधित राखणार, अशी घोषणाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. दरम्यान, प्राधिकरणात नियोजित ३२ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी अनेकांच्या जमिनी आणि घरे जाणार आहेत. रस्ते कोणते किंवा कोणत्या घरांचा समावेश आहे, यासाठी ४२ गावांमधील सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे. याच वेळी या सर्व लोकप्रतिनिधींची मते जाणून घेतली जाणार आहेत.  

प्राधिकरण समितीकडून जमिनीचा मोबदला देण्यासाठी किंवा एफएसआय देण्यासाठी तत्काळ निर्णय घेतले जाणार आहेत. याबाबत आणखी नियोजन कसे करता येईल, यासाठी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील व त्यांचे इतर सहकारी काम करत आहेत. दरम्यान, ज्या रस्त्यांसाठी ज्या लोकांच्या जमिनी जातील त्यांना तेवढ्याच किमतीचा तत्काळ मोबदला किंवा एफएसआय देण्याची तयारी श्री. पाटील यांनी दर्शवली आहे.

प्राधिकरण करताना राज्य सरकारने ज्या घोषणा केल्या आहेत, त्याचे तंतोतंत पालन झाले पाहिजे, अशी मागणी ग्रामपंचायत पातळीवर होत आहे. लोकांची मते जाणून घेऊनच पुढील निर्णय घेतला जावा, अशीही मागणी आहे. त्यामुळे लोकांच्या मागणीचा विचार करता रस्त्यांमध्ये ज्यांचे घर जाणार आहे, त्यांना सरकारच्या नियमानुसार घर दिले जाईल आणि जमिनीच्या बदल्यात एफएसआय देण्याबाबत कोणतीच अडचण नसल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे.   

समाविष्ट ४२ गावे : 
करवीर तालुक्‍यातील ३७ गावे : पाचगाव, वडणगे, पाडळी खुर्द, बालिंगा, हणमंतवाडी, नागदेववाडी, चिखली, आंबेवाडी, रजपूतवाडी, शिये, वळिवडे (गांधीनगरसह), चिंचवाड, मुडशिंगी, सरनोबतवाडी, तामगाव, नेर्ली, गोकुळ शिरगाव (एमआरडीसी वगळून), कणेरी, कंदलगाव, भुये, निगवे दुमाला, भुयेवाडी, कणेरीवाडी, मोरेवाडी, मादळे, सादळे, जठारवाडी, वाडीपीर, वाशी, नंदवाळ, गिरगाव, कोगील खुर्द, कसबा करवीर, उजळाईवाडी, नवे बालिंगे, कळंबे तर्फ ठाणे व उचगाव. 
हातकणंगले तालुक्‍यातील पाच गावे : शिरोली दुमाला (एमआरडीसी वगळून), टोप, कासारवाडी, संभापूर व नागाव

प्राधिकरणाच्या आराखड्यामध्ये रस्त्यांमध्ये मोजकीच घरे आली आहेत. त्यांना घराच्या बदल्यात घर दिले जाईल. रस्त्यासाठी एखाद्याची जमीन गेली असेल, त्याला एका गुंठ्यासाठी एक गुंठे एफएसआय दिला जाईल. प्राधिकरण यशस्वीपणे साकारण्यासाठी सर्वांना विश्‍वासात घेतले जाईल. लवकरच प्राधिकरणातील समाविष्ट गावांमध्ये असलेल्या गावांमधील सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे. 
- शिवराज पाटील, 

मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण
 

 

Web Title: Kolhpur News increase in Municipal border limit