सातासमुद्रापार धावणारी नवदुर्गा

सातासमुद्रापार धावणारी नवदुर्गा

कोल्हापूर -  ही पोरगी तुमच्या आमच्या घरातल्या पोरीसारखीच. ताराबाई पार्कात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दोन खोल्यांच्या क्वार्टर्समध्ये राहाणारी. वडील वारले आणि त्यांच्या जागी आई नोकरीला लागली. या पोरीला कसलीही खेळाची पार्श्‍वभूमी नाही, पण धावायची आवड. काहीही करायला निघाली की वुंईऽऽऽ करत पळतच सुटायची आणि आपली आवड जपायची. धावणे हा स्वतंत्र वैयक्तिक क्रीडाप्रकार आहे हे देखील तिला माहीत नव्हतं; पण तिनं आवड जपली. धावण्याच्या स्पर्धेत उतरत गेली. आज ती महाराष्ट्र पोलिस दलाची टॉपची खेळाडू आहे. 

१७ वर्षांपूर्वीच्या दादासाहेब मगदूम हायस्कूलमधली ही साधी पोरगी तीन वेळा नुसता परदेशात नव्हे तर तेथून सुवर्णपदक मिळवून आली आहे. देशातल्या दहा उत्कृष्ट धावपटूतली ही एक आपल्या कोल्हापूरची नवदुर्गा म्हणूनच ओळखली जात आहे.
या पोरीचं नाव जयश्री महालिंग बोरगी. आज पोलिस दलात सहायक पोलिस निरीक्षक पदावर आहे. खेळाडू खूप आहेत. खेळ खूप आहेत. त्यास गाजलेलेही अनेक आहेत, पण जयश्री ही त्यातही एक वेगळी ओळख आहे. 

तिची आई महादेवी नवरा वारल्यानंतर अनुकंपा तत्त्वावर सार्वजनिक बांधकाम खात्यात शिपाई म्हणून नोकरीला लागलेली. पोरगी जयश्रीची धावण्याच्या क्रीडा प्रकारातली इच्छा पूर्ण करण्यासाठी ही आई तयार झाली. जयश्री सराव करायची. थकून घरी यायची. घरी जेवण काय? तर भाकरी, भाजी, भात, आमटी, दूध, फळे, फळांचा रस हे तीला माहीतच नाही, पण खेळात करिअर करायचं म्हटल्यावर ते टाळूनही चालणार नाही.

फळाचे, ज्युसचे दर बघितले तर ते न परवडणारे. मग आईने एक मार्ग काढला. ती रात्री मंडई बंद व्हायच्या आसपास खरेदीला जायची. फळवाल्याला दुकान किंवा गाडी बंद करायची घाई असायची. उरलेली फळे येईल त्या दरात संपवायची त्याची तयारी असायची. उरलेली फळेही थोडी सुकलेली, थोडी बाद झालेली असायची. मग जयश्रीची आई ती खरेदी करायची आणि पोरीला त्याचा ‘खुराक’ द्यायची.
जयश्रीला तिच्या सुरवातीच्या काळात गौरी देवणे, शुभांगी आदिक व मैत्रिणींनी मैदानावर साथ दिली. शाळेत, महाविद्यालयीन पातळीवर जयश्री स्पर्धा गाजवू लागली. तिच्या छोट्याशा घरात खुंटीला पदके लटकताना दिसू लागली. ती २०११ साली पोलिसात भरती झाली आणि तिच्या वेगाने आणखी उंची गाठली. २०१५ व २०१७ दोन वर्षे ती वर्ल्ड पोलिस चॅम्पियनसाठी व्हर्जिनिया व अमेरिकेस गेली. तेथून सुवर्ण पदकाची लयलुटच करून परतली.

आता ती पोलिस दलात सहायक पोलिस निरीक्षक पदावर आहे, पण तिच्या अंगावर खाकी वर्दी कमी आणि ट्रॅकसूटच कायम आहे. आता तिचे लक्ष २०१८ साली होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेकडे आहे. पोलिस दलातले सर्व अधिकारी तिच्या पाठीशी आहेत.

पाय जमिनीवरच...
ती आजही खूप साधी आहे. तीन वेळा परदेशवारी, सुवर्णपदकाची लयलूट म्हटल्यावर एखादी कायम ‘‘हवेत’’ असती; पण ही जमिनीवरच आहे. एक साध्या नव्हे तर अगदी साध्या घरातली ही आज देशात नावारूपाला आली आहे. या मागे तिचा सराव, जिद्द आहेच; पण ती म्हणजे इतर खेळाडूंची आता प्रेरणा आहे. आपल्या कोल्हापुरातली ही पोरगी परवा अमेरिकेहून चार सुवर्णपदके घेऊन आली. तिची मिरवणूक निघाली. तिच्याच शब्दात सांगायचं झालं तर आनंदाश्रूने डबडबलेल्या डोळ्यानीच तिने ही मिरवणूक अनुभवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com