फिर्यादीने आरोपीची मोटारसायकल ओळखली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

नगर - कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीने वापरलेली दुचाकी पीडित मुलीच्या चुलतभावाने आज न्यायालयात ओळखली. न्यायालयात आणलेली सायकल पीडित मुलीचीच असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी उलटतपासणी घेतली.

नगर - कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीने वापरलेली दुचाकी पीडित मुलीच्या चुलतभावाने आज न्यायालयात ओळखली. न्यायालयात आणलेली सायकल पीडित मुलीचीच असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी उलटतपासणी घेतली.

या खून खटल्याची सुनावणी विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू आहे. फिर्यादीची आज सरतपासणी व उलटतपासणी झाली. "पोलिस घटनास्थळी आल्यानंतर सायकलीची जागा, पीडित मुलगी पडलेली जागा दाखविली. त्यानंतर आरोपी पप्पू शिंदे पळाला, ती जागाही दाखविली. तसेच बाभळीच्या झाडाखाली असलेली आरोपीची दुचाकी दाखविली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करण्यास सुरवात केली,' अशी साक्ष मुलीच्या चुलतभावाने दिली.

त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी उलटतपासणी केली. "न्यायालयात काल दाखविलेला नकाशा घटनास्थळी काढल्यानंतर पुन्हा पाहिला होता का? पीडित मुलीच्या वडिलांचे दूरगावजवळ हॉटेल आहे. त्या हॉटेलचे नाव काय आहे?' या प्रश्‍नांवर साक्षीदाराने "माहीत नाही', असे उत्तर दिले. "पप्पू शिंदे पळाला ते शेत कशाचे होते? बाजरीचे की सूर्यफुलाचे?' यावर "ते बाजरीचे होते,' असे त्याने सांगितले. कुळधरण येथील रुग्णालयात पीडित मुलीची तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव माहीत नाही. केसपेपर कोणी काढला, हेही माहीत नाही, असे त्याने सांगितले. पीडित मुलीला पोलिसांनी वाहनातून कर्जत येथील आरोग्य केंद्रात नेले. फिर्याद देण्यासाठी सुमारे दीड तास लागला. त्या वेळी सोबत बरेच लोक होते. फिर्याद दिल्यावर किती सह्या केल्या, त्याबाबत काहीही आठवत नसल्याचे तो म्हणाला.
दरम्यान, 13 जुलै 2016 रोजी रात्री साडेनऊ वाजता लालासाहेब सुद्रिक यांनी कोणी तरी अज्ञात व्यक्तीने पीडित मुलीचा खून केल्याचे पोलिस ठाण्यात सांगितले. तशी नोंद पोलिस ठाण्यात आहे. ही बाब पोलिसांनी तुम्हाला सांगितली का? यावर तो "नाही' म्हणाला. "न्यायालयात दाखविलेली चप्पल, मोटारसायकल आरोपीची नाही. या वस्तू कोठेही बाजारात मिळतात. तुम्ही खोटी साक्ष दिली,' असे आरोपीचे वकील म्हणाले. त्यावर चप्पल, मोटरसायकल आरोपीचीच असून, मी खोटी साक्ष दिली नसल्याचे त्याने सांगितले.

Web Title: kopardi case