कट रचून बलात्कार, खुनाचा आरोप ठेवावा: निकम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

आरोपींनी पीडित मुलीवर बलात्कार करून खून केला आहे. तसा सकृतदर्शनी पुरावा आहे. त्यामुळे आरोपींवर कट रचून बलात्कार व खून केल्याचा आरोप ठेवण्यात यावा.
- ऍड. निकम म्हणाले.

नगर - कोपर्डी (ता. कर्जत) येथे बलात्कार करून अल्पवयीन मुलीचा खून केल्याच्या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींवर कट रचून बलात्कार व खून केल्याचा आरोप ठेवावा, अशी विनंती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज न्यायालयास केली.

कोपर्डी बलात्कार व खून खटल्याची सुनावणी आज येथील जिल्हा विशेष सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात सुरू झाली. आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ, नितीन भैलुमे यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारची बाजू मांडताना ऍड. निकम म्हणाले, ‘आरोपींनी 13 जुलै रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केला आहे. त्यांच्यावर बलात्कार, खून व बालकांचे संरक्षण आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार आरोप ठेवले आहेत. मात्र गुन्ह्यातील संपूर्ण कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले, की तिन्ही आरोपींनी गुन्हा घडण्याच्या चार दिवस आधी पीडित मुलीची छेड काढली होती, दमही दिला होता. आरोपी एकमेकांचे नातेवाईक असून, जवळचे मित्रही आहेत. गुन्ह्याच्या चार दिवस आधी तिन्ही आरोपी पीडित मुलीच्या घराजवळच्या रस्त्याने फिरत होते. गुन्हा घडला त्या दिवशी आरोपी नितीन भैलुमे व संतोष भवाळ रस्त्यावर टेहळणी करीत होते.‘‘

गुन्ह्याची पार्श्‍वभूमी पाहता हे एकट्या आरोपीने केलेले कृत्य नसावे. गुन्ह्यात निश्‍चितपणे अन्य आरोपींचा सहभाग आहे. कारण ज्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला पीडित मुलीचे कपडे मिळाले, त्याच्या विरुद्ध दिशेला तिचा मृतदेह मिळाला. यावरून स्पष्ट होते की तिन्ही आरोपींनी पीडित मुलीवर बलात्कार करून खून केला आहे. तसा सकृतदर्शनी पुरावा आहे. त्यामुळे आरोपींवर कट रचून बलात्कार व खून केल्याचा आरोप ठेवण्यात यावा, असे ऍड. निकम म्हणाले.

त्यावर आरोपनिश्‍चितीचा मसुदा न्यायालयात सादर करावा, असा आदेश न्यायालयाने दिला. दुपारी चार वाजता आरोपनिश्‍चितीचा मसुदा न्यायालयात सादर करण्यात आला. त्या वेळी आरोपींचे वकील ऍड. योहान मकासरे, ऍड. प्रकाश आहेर न्यायालयात उपस्थित होते.

जामीन अर्जावर आज सुनावणी
आरोपी नितीन भैलुमे याचे वकील प्रकाश आहेर यांनी काल (मंगळवारी) न्यायालयात अर्ज करून, जामीन व गुन्ह्यातून मुक्तता करण्याची मागणी केली होती. मात्र उद्या आरोपींवर दोषारोप निश्‍चित झाल्यानंतर त्यावर सुनावणी होईल, असे न्यायालयाने सांगितले.

आरोपींना सरकारी खर्चातून वकील
सरकारी खर्चातून वकील मिळावा, अशी मागणी काल दोन आरोपींनी न्यायालयाकडे केली. त्यामुळे विधी सेवा प्राधिकरणाकडून ऍड. योहान मकासरे यांची आरोपींचे वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. ऍड. मकासरे यांनी आज सकाळी तसे पत्र न्यायालयाला दिले.

Web Title: kopardi Conspired against rape, murder allegations put: Nikam