दातांचे ठसे आरोपी शिंदे याचेच 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

नगर - पीडित मुलीचे आरोपी जितेंद्र शिंदे याने चावे घेतले होते. त्याच्या दातांच्या ठशांशी ते ठसे जुळत असल्याचे पुणे येथील मानवी दातांच्या ठसेतज्ज्ञ डॉ. हेमलता पांडे यांनी आज न्यायालयात सांगितले. या खटल्यात एकूण 24 जणांच्या साक्षी पूर्ण झाल्या. 

नगर - पीडित मुलीचे आरोपी जितेंद्र शिंदे याने चावे घेतले होते. त्याच्या दातांच्या ठशांशी ते ठसे जुळत असल्याचे पुणे येथील मानवी दातांच्या ठसेतज्ज्ञ डॉ. हेमलता पांडे यांनी आज न्यायालयात सांगितले. या खटल्यात एकूण 24 जणांच्या साक्षी पूर्ण झाल्या. 

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याची सुनावणी विशेष जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर आज सुरू झाली. ती सलग चार दिवस सुरू राहील. तीन साक्ष आज झाल्या. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी डॉ. पांडे यांची सरतपासणी घेतली. त्या म्हणाल्या, ""पोलिसांनी बोलाविल्यानंतर 19 जुलै 2016 रोजी कर्जत येथे जाऊन आरोपींच्या दातांचे ठसे घेतले. पीडित मुलीच्या अंगावर ठिकठिकाणी चावे घेतल्याच्या खुणा होत्या. पाठीमागील जखमा अस्पष्ट असल्याने त्या कोणत्याही आरोपीच्या दातांच्या ठशांशी जुळत नाहीत. मुलीच्या छातीवरील चाव्यांचे ठसे शिंदेच्या दातांच्या ठशांशी जुळतात.'' 

पोलिस कॉन्स्टेबल सागर जंगम यांचीही साक्ष झाली. ते म्हणाले, ""20 जुलै रोजी 37 सीलबंद पाकिटे मुंबईतील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत दाखल केली.'' आरोपीचे वकील ऍड. योहान मकासरे, ऍड. प्रकाश आहेर यांनी डॉ. पांडे, जंगम यांची उलटतपासणी घेतली. 

निकम यांनी घेतलेल्या सरतपासणीत पंच, साक्षीदार तहसीलदार किरण सावंत म्हणाले, ""माझ्यासमोर दोन साक्षीदारांनी आरोपीची माळ ओळखली.'' सरकारी अधिकारी असल्याने त्यांची उलटतपासणी झाली नाही. दरम्यान, एका नवीन साक्षीदारासाठी निकम यांनी न्यायालयात अर्ज केला. 

ठशांची चित्रफीत दाखविली 
पीडित मुलीच्या अंगावरील चावा घेतलेल्या ठशांच्या जखमा आणि आरोपीच्या दातांच्या ठशांच्या "मॉडेल'ची चित्रफीत न्यायालयात दाखविण्यात आली. या वेळी अन्य वकील व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना न्यायदान कक्षात प्रवेश देण्यात आला नव्हता. 

वकील पुन्हा गैरहजर; आरोपीला दंड 
खटल्याची सुनावणी सुरू झाल्यानंतर आरोपी संतोष भवाळ याने वकील बाळासाहेब खोपडे आजारी असल्याबाबत अर्ज केला. ऍड. निकम यांनी त्यावर हरकत घेतली. ते म्हणाले, ""आतापर्यंत दोन वेळा आरोपीचे वकील गैरहजर राहिले. त्यांच्या आजारपणाबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले नाही. मुंबई येथील वैद्यकीय अधिकारी दोन वेळा साक्ष देण्यासाठी हजर राहिले. कर्जतचे चार साक्षीदार तीन-चार वेळा आले. खटल्याचे काम न झाल्याने त्यांना परत जावे लागले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार साक्षीदार न्यायालयाचे पाहुणे असतात. त्यांची आज पर्यायी व्यवस्था करायला हवी होती. आरोपीचा अर्ज फेटाळावा.'' न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून आरोपीचा अर्ज फेटाळला. साक्षीदारांना येण्या-जाण्याचा त्रास दिल्याबद्दल, दोन साक्षीदारांसाठी प्रत्येकी पाच हजार व तीन साक्षीदारांसाठी प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याकरिता भवाळ याला एकूण 19 हजार रुपये दंड केला. दंड भरल्यानंतरच आरोपीच्या वकिलाला उलटतपासणी घेता येईल, असे न्यायालयाने सांगितले.

Web Title: kopardi torture and murder case