कोपरगाव : बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

साई प्रमोद बारहाते (वय 7) हा मुलगा आज (सोमवार) सकाळी आजी, आजोबा शेतात काम करत असताना शेतात खेळत होता. खेळत असताना तो बोअरवेलमध्ये पडला होता.

कोपरगाव - येथील मुर्शतपूर शिवारातील देवकर वस्तीवर बोअरवेलमध्ये पडलेल्या सात वर्षांच्या मुलाला वाचवण्यात अपयश आले. या मुलाला बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढण्यात यश आले होते, मात्र, रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, साई प्रमोद बारहाते (वय 7) हा मुलगा आज (सोमवार) सकाळी आजी, आजोबा शेतात काम करत असताना शेतात खेळत होता. खेळत असताना तो बोअरवेलमध्ये पडला होता. साई 15 ते 20 फुटांवर बोअरवेलमध्ये अडकला होता. कुपनलिकेत ऑक्सिजनची सुविधा करण्यात आली आणि त्याला वाचविण्याची मोहिम सुरु करण्यात आली होती. 2 पोकलन मशीनच्या साहाय्याने बोअरवेल शेजारी खड्डा खाणण्यात आला. समांतर खड्डा खाणून त्याला बाहेर काढण्यात आले. यावेळी रुग्णवाहिकाही त्याठिकाणी आणण्यात आली होती. त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

कोपरगाव तालुक्यात बोअरवेलमध्ये मुलगा पडल्याची ही पहिलीच घटना आहे. एडीआरएफ व स्थानिक प्रशासनाच्या मदतीला या मुलाला बाहेर काढण्यात आले होते. घटनास्थळी बघ्यांची गर्दी खूप झाल्याने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तहसीलदार, आमदार, माजी सभापती सुनील देवकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले होते.

Web Title: Kopargaon: Death of a boy lying in a borewell