दोन शिंद्यांमध्ये भोसलेंची चाचपणी!

दोन शिंद्यांमध्ये भोसलेंची चाचपणी!

सातारा - कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्याविरोधात आता कोरेगाव विकास परिषदेचे नेते यशवंत भोसले यांनी चाचपणी सुरू केली आहे. भाजपच्या माध्यमातून ते रिंगणात उतरण्याची तयारी करत असून, सध्या याच पक्षातून महेश शिंदे यांनीही तयारी सुरू केली आहे. भाजपकडून दोन इच्छुकांपैकी कोणाला संधी मिळणार याचीच उत्सुकता आहे.

कोरेगाव मतदारसंघात आमदार शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीतील नाराजांनी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. मात्र, पक्षातील नेत्यांनी त्यांची फारशी दखल घेतलेली नाही. आता या मतदारसंघात भाजपकडून इच्छुक असणाऱ्यांची संख्या दोन झाली आहे. यापूर्वीच महेश शिंदे यांनी रान उठविले आहे. आता त्यांच्याच पक्षाचे पिंपरी- चिंचवडचे नेते यशवंत भोसले यांनीही चाचपणी सुरू केली आहे. श्री. भोसले हे राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या माध्यमातून कार्यरत असून, कामगार युनियन चालवितात. कोरेगाव तालुक्‍यातील दुघी हे त्यांचे गाव आहे. मध्यंतरी भाजपच्या लाटेत सत्ता परिवर्तन झाल्यावर श्री. भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी पिंपरी- चिंचवड महापलिकेची निवडणूक लढली. त्यात त्यांना यश मिळाले नाही. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत कोरेगाव विकास परिषदेच्या माध्यमातून श्री. भोसले यांनी रान उठविले होते. शशिकांत शिंदेंच्या विरोधात निवडणूक लढले; पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, तसेच त्यांना राष्ट्रवादीत प्रदेश कार्यकारिणीत सरचिटणीस पदावर संधी दिली गेली.  आता त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा कोरेगाव मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे. २०१४ च्या निवडणुकीनंतर त्यांचा कोरेगाव मतदारसंघातील संपर्क कमी झाला असला, तरी आता २०१९ च्या निवडणुकीसाठी त्यांनी पुन्हा कोरेगावातून लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून मोठा मेळावा घेण्याबाबत चर्चा केली आहे. 

२००९ च्या निवडणुकीत श्री. भोसले यांना दहा हजार ७०१ मते मिळाली होती, तर शालिनीताई पाटील यांना ४८ हजार ६२० मते, तर शशिकांत शिंदे यांना ८० हजार ३७३ मते मिळाली होती. सध्या कोरेगाव मतदारसंघात भाजपकडून महेश शिंदे यांनी वातावरण निर्मिती सुरू केली आहे. मध्यंतरी दोन मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यास त्यांनी शक्तिप्रदर्शनही केले होते. अशातच भाजपचे दुसरे नेते श्री. भोसले यांनी निवडणुकीसाठी या मतदारसंघातून चाचपणी सुरू केल्याने भाजप नेमके कोणाला तिकीट देणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com