कोरेगावात ‘राजकीय भिशी’ला जोम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

कोरेगाव - आर्थिक अडचणींवरील उपायाचा भाग म्हणून एकत्रित आलेल्या ठराविक जणांकडून भिशी चालवली जाते; पण नावाला तशी भिशी सुरू करून संभाव्य राजकीय स्थितीवर उपाय शोधण्यासाठी गेल्या नऊ महिन्यांपासून कोरेगाव भागात चाललेल्या प्रयत्नांची चर्चा सध्या जोमात सुरू आहे. 

‘निष्ठावंतांना सन्मान हवा, गेली २० वर्षे बाहेरचे नेतृत्व सोसले, आता विधानसभेसाठी स्थानिक उमेदवार हवा’, असा अजेंडा घेऊन एकत्रित आलेल्या राष्ट्रवादीतील नाराजांनी दबाव गट स्थापन करून सुरू केलेली ही राजकीय भिशी चांगलीच चर्चेत आली आहे. 

निष्ठावंतांना सन्मान मिळत नाही, असे कारण पुढे करत आमदार शशिकांत शिंदे यांच्यापासून दुरावलेल्या राष्ट्रवादीतील नाराजांनी एकत्रित येऊन दबाव गट तयार केला आहे. त्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना मानणारे कार्यकर्ते, लक्षमणराव पाटील गटाचे, तसेच पूर्वाश्रमीच्या शालिनीताई पाटील गटाचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत. त्यासाठी सुनील खत्री आणि कोरेगाव मतदारसंघातील पंचायत समितीच्या सात गणांतील प्रत्येकी दोघे अशा एकूण १५ जणांचा समावेश असलेली कोअर समिती तयार केली आहे. एकत्र येण्यासाठी निमित्त हवे म्हणून या सर्वांनी भिशीचे माध्यम निवडले आहे. त्यात सुमारे ५० कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आहे. प्रत्येकी एक हजार याप्रमाणे दरमहा ठराविक तारखेला रक्कम जमा केली जाते. चिठ्ठीद्वारे भिशी काढली जाते.

भिशी लागलेल्या कार्यकर्त्याने भिशीतील सर्व सदस्यांना जेवण द्यायचे असा नियम आहे. सर्व जण एकत्र आले की बैठकीचे स्वरूप प्राप्त होते आणि त्यात राजकीय विचारांची देवाण- घेवाण होते. अशा प्रकारे गेल्या नऊ महिन्यांपासून मतदारसंघातील कोरेगाव तालुक्‍यातील विविध नऊ गावांमध्ये नाराजांच्या बैठका झाल्या आहेत. यापैकी काही बैठकांना दीडशे-दोनशे कार्यकर्त्यांनी हजेरी लावली आहे.

आता स्थानिक उमेदवारच हवा...
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून संघटना बळकट ठेवून पक्ष सांगेल त्यांना निवडून आणले. गेली २० वर्षे बाहेरचे नेतृत्व सोसले. दरम्यान, अपेक्षित विकास तर झालाच नाही. याउलट अलीकडच्या काळामध्ये कार्यकर्त्यांच्या खच्चीकरणाची प्रक्रिया मात्र जोमाने सुरू झाली आहे. त्यामुळे संघटना विस्कळित झाली असून, कार्यकर्त्यांना मान सन्मान मिळवून देण्यासाठी निष्ठावंतांनी एकत्र राहिले पाहिजे आणि यापुढे विधानसभेसाठी स्थानिक उमेदवारच असला पाहिजे’, असा सूर या बैठकांमधून निघत असल्याने ही राजकीय भिशी चर्चेत येऊ लागली आहे. 

Web Title: koregaon politics NCP