रिक्‍त पदांमुळे पशुधनाचे भवितव्य रामभरोसे 

रिक्‍त पदांमुळे पशुधनाचे भवितव्य रामभरोसे 

कोरेगाव - शासनाच्या येथील लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयात (मिनी पॉलिक्‍लिनिक) व्रणोपचारक (ट्रेसरर) व परिचर (कंपाउंडर) ही दोन पदे गेल्या चार वर्षांपासून रिक्त असल्याने पशुवैद्यकांना जनावरांची तपासणी, औषधोपचार, प्रसंगी शस्रक्रिया करण्याबरोबर लसीकरण आदी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबवताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. तद्वत शहराच्या मध्यवर्ती असलेल्या या सर्वचिकित्सालयाच्या संरक्षण भिंतीचे मुख्य प्रवेशद्वार, चिकित्सालयाचा आतील दरवाजा, इतर दारे, खिडक्‍यांच्या सळया, काचा तोडण्यात आल्याने, आवारात झाडेझुडपे वाढली असल्याने, कचरा इतस्तत: पसरला असल्याने चिकित्सालयाला बकाल स्वरूप आले आहे.

ऑक्‍टोबर २०१२ मध्ये सुरू झालेल्या या सर्वचिकित्सालयाचे कार्यक्षेत्र कोरेगाव शहरासह १७ गावे आहे. मात्र, हे सर्वचिकित्सालय असल्यामुळे कोरेगाव तालुक्‍यासह लगतच्या तालुक्‍यातील जनावरांवरही उपचार करावे लागतात. सर्वचिकित्सालयाची महिन्याची ‘ओपीडी’ ही सुमारे ४०० आहे.  सर्वचिकित्सालयात जनावरांचे एक्‍सरे काढणे, प्रयोगशाळा, रक्त तपासणी, सोनोग्राफी, जनावरांचे शस्त्रक्रियागृह, जनावरांना उपचारार्थ दाखल करून घेणे आदी सोयीसुविधा आहेत. त्यामुळे कोरेगाव शहर, पंचक्रोशी, तालुक्‍यातील पशुपालकांच्या सर्व वर्गातील जनावरांचे गंभीर आजार, मोठ्या व अवघड शस्त्रक्रियांसाठी सातारा येथील पॉलिक्‍लिनिकमध्ये जा-ये करण्यासाठी होणारा त्रास कमी झाला. त्यामधून पशुपालकांच्या वेळ आणि पैशाची बचत झाली. सुरवातीला येथे जनावरांवर चांगल्या पध्दतीने उपचार सुरू झाले होते. मात्र, त्यानंतर हळूहळू या चिकित्सालयाला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांच्या टंचाईचे ग्रहण लागले ते आजअखेर सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी या सर्वचिकित्सालयाचा संपूर्ण कारभार सहायक आयुक्त (पशुसंवर्धन) डॉ. देवेंद्र जाधव हे एकटे सांभाळत होते. त्यामध्ये त्यांना चिकित्सालयाचा दरवाजा उघडण्यापासून जनावरांची तपासणी, औषधोपचार, प्रसंगी शस्त्रक्रिया, लसीकरण, जनावरांचे साथरोग निर्मूलन, शासकीय बैठका आदी सर्व कामे करावी लागत होती. 

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून डॉ. जाधव यांच्या जोडीला पशुधन विकास अधिकारी डॉ. डी. पी. लोखंडे हे रूजू झाले असून, या दोघांनी समन्वय ठेवून चिकित्सालयातून जनावरांवर चांगल्या पध्दतीने तपासणी, औषधोपचार सुरू केले आहेत. जनावरांचे लसीकरणही पूर्ण क्षमतेने करण्यात येत आहे. त्यांच्या जोडीला सातारा पॉलिक्‍लिनिकमधून एक पहारेकरी देण्यात आलेला आहे. मात्र, अत्यंत आवश्‍यक असणारी व्रणोपचारक व परिचर ही दोन पदे गेल्या चार वर्षांपासून रिक्त असल्याने दोन्ही पशुवैद्यकांना काम करताना तारेवरची कसरत करावी लागताना दिसत आहे. त्यामध्ये त्यांना जनावरांची तपासणी, औषधोपचार, लसीकरण, जनावरांचे साथरोग निर्मूलन, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अडचणी येत आहेत. चिकित्सालयासह आवारातील अस्वच्छतेसह बकालपणावरही मात करता येत नाही.

सर्वचिकित्सालयात हे करणे जरुरीचे...

- व्रणोपचारक, परिचर ही पदे भरण्याची गरज
- डिजिटल एक्‍सरेची सुविधा हवी
- तीन सुरक्षारक्षकांची आवश्‍यकता
- वृक्षारोपण व संवर्धन करायला हवे  


कोरेगावच्या लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयातील रिक्त व्रणोपचारक, परिचर ही दोन पदे भरण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. तद्वत पशुचिकित्सेत आम्ही कसलीही हयगय होऊ देत नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करून आम्ही पशुसेवेसह शासकीय कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करत आहोत.
-डॉ. देवेंद्र जाधव, सहायक आयुक्त (पशुसंवर्धन) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com