राष्ट्रवादीच्या गडावर काँग्रेसचा सवतासुभा

Politics
Politics

कोरेगाव - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे लोकसभेच्या सातारा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांचेच नाव अपेक्षेप्रमाणे घोषित झाले आणि त्यांच्या विजयासाठी कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीने कंबर कसल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या मेळाव्याने स्पष्ट झाले. पण, राष्ट्रवादीच्या गडावर काँग्रेसचे नेते ॲड. विजयराव कणसे यांच्या गटाने राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर न जाण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या दुसऱ्या गटाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे कोरेगाव मतदारसंघात आघाडीची एकत्रित प्रचार यंत्रणा कार्यरत होणार का? याविषयी उत्सुकता आहे.

आघाडीचा उमेदवार निश्‍चित झाला असतानाच, दुसरीकडे ही जागा शिवसेनेकडेच राहण्याचे संकेत असल्याचे ताज्या घडामोडींवरून दिसत असले तरी, या जागेसंदर्भात भाजपची अधिकृत भूमिका अद्यापही स्पष्ट न झाल्याने युतीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

आमदारांपुढे आव्हान
जिल्ह्यातील लोकसभेची जागा राखण्याची जबाबदारी पार पाडण्याचे एकमेव उद्दिष्ट सध्या राष्ट्रवादीतील सर्व नेत्यांपुढे आहे. विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी म्हणून आमदार शिंदे यांच्यासाठी लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. याशिवाय विधानसभेत पक्षाचे प्रतोद म्हणूनही ते जबाबदारी पार पाडत आहेत. त्यामुळे स्वाभाविकच जिल्ह्यातील लोकसभेची जागा राखण्यामध्ये उठावदार कामगिरी करून दाखवण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यासाठीच त्यांनी सर्वप्रथम कोरेगावात कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन वातावरण निर्मितीला चालना दिली आहे. 

उदयनराजे यांना देशात विक्रमी मतांनी निवडून आणण्याचे आवाहन करतानाच त्यांना स्टार प्रचारक म्हणून सर्वत्र फिरवले जावे, अशी अपेक्षाही आमदार शिंदे समर्थकांनी या मेळाव्यामध्ये व्यक्त केली. दरम्यान, या मेळाव्यामध्ये उदयनराजे यांनीही सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवत केंद्रातील व राज्यातील सरकारच्या धोरणांवर कडाडून हल्ला चढवला. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही उदयनराजे यांनी टिकेचे लक्ष्य केले. एरवीची त्यांची भाषणशैली सर्वश्रुत असताना कोरेगावातील मेळाव्यात मात्र ‘सत्ताधाऱ्यांचा एक कडवा विरोधक’, अशी भाषणशैली कोरेगावकरांनी प्रथमच ऐकली. कोरेगावातील राष्ट्रवादीमध्ये चैतन्य निर्माण करण्यामध्ये उदयनराजे आणि आमदार शिंदे पहिल्याच मेळाव्यामध्ये यशस्वी ठरले असले तरी, या गडावरून अनेक अंगाने होणाऱ्या हालचाली सकारात्मक निर्णयासाठी बारकाईने टिपणे गरजेचे आहे, असे दिसते. 

युतीपुढेही अडथळे
दरम्यान, काँग्रेसच्या एका गटाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर न जाण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता काँग्रेसमधील दुसऱ्या गटाच्या हालचाली गतिमान झाल्या असून, हा गट कोणती भूमिका घेणार? याविषयी उत्सुकता आहे. 

अलीकडच्या काळात शिवसेना बॅकफुटवर गेल्याचे आणि भाजपने गावोगावी कार्यकर्ते मिळवल्याचे चित्र कोरेगाव मतदारसंघात दिसू लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर साताऱ्याची जागा शिवसेनेकडे जाणार असल्याचे संकेत ताज्या घडामोडींवरून मिळू लागले आहेत; परंतु या जागेसंदर्भातील भाजपची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट न झाल्याने युतीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

आघाडीबरोबरच युतीतही गटबाजी
आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये गटबाजी आहे. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसमधील एका गटाने राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर न जाण्याचा निर्णय घेतल्याने दुसऱ्या गटाच्या भूमिकेकडे लक्ष आहे.

राष्ट्रवादीने आमदार शशिकांत शिंदे यांच्या पुढाकाराने कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन उदयनराजे यांच्या प्रचारास प्रारंभ केला आहे; परंतु राष्ट्रवादीतील नाराज गटाची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. असे असले तरी, उदयनराजे यांना उघड विरोध करण्याचे धैर्य मित्र पक्षांमधील कोणीही दाखवणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. युतीतील शिवसेनेमध्ये मोठी गटबाजी असून, भाजपमध्ये मात्र सुप्त गटबाजी असल्याचे बोलले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com