कोरेगावात ५४ ग्रामपंचायतींची रणधुमाळी

राजेंद्र वाघ
मंगळवार, 4 जुलै 2017

वॉर्ड प्रस्तावांचे प्रारूप प्रसिद्ध; ११ जुलैपर्यंत हरकती दाखल करण्यास मुदत

वॉर्ड प्रस्तावांचे प्रारूप प्रसिद्ध; ११ जुलैपर्यंत हरकती दाखल करण्यास मुदत
कोरेगाव - नव्याने गठित झालेल्या बोरीव ग्रामपंचायतीबरोबरच राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कुमठे, खेड, एकंबे, नागझरी, पिंपोडे बुद्रुक, सोनके, वाघोलीसह तालुक्‍यातील ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. ग्रामपंचायतस्तरावर तयार झालेल्या वॉर्ड प्रस्तावांचे प्रारूप आज प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर उद्यापासून (ता. ४) ११ जुलैपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत आहे. त्यामुळे गावपातळीवर जुळवलेली वाडा, भावकीची समीकरणे कायम राखण्यासाठी पुढाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. दिवाळीच्या दरम्यान या ग्राम-पंचायतींच्या निवडणुकांचे धुमशान खऱ्या अर्थाने रंगणार असून, गावपातळीवरील गटातटाच्या राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर कोणाचे फटाके फुटणार, कोणाचा बार फुसका ठरणार? याविषयीच्या तर्कवितर्कांना आतापासूनच उधाण आले आहे.

तालुक्‍यामध्ये नव्याने गठीत झालेल्या बोरीव ग्रामपंचायतीबरोबरच येत्या ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे - अंबवडे (संमत कोरेगाव), अनभुलेवाडी, अपशिंगे, आसनगाव, आसगाव, बनवडी, बर्गेवाडी, बेलेवाडी, भावेनगर, चिमणगाव, धुमाळवाडी, एकंबे, घिगेवाडी, गोळेवाडी, गुजरवाडी (पळशी), जाधववाडी, जळगाव, जांब खुर्द, जरेवाडी, करंजखोप, कवडेवाडी, खडखडवाडी, खामकरवाडी, खेड, खिरखिंडी, कुमठे, मोहितेवाडी, मोरबेंद, नागझरी, नायगाव, न्हावी बुद्रुक, पवारवाडी, पिंपोडे बुद्रुक, पिंपोडे खुर्द, रामोशीवाडी, रणदुल्लाबाद, रुई, सायगाव, सांगवी, शेल्टी, शिरंबे, सोनके, सुलतानवाडी, वडाचीवाडी, वाघजाईवाडी, जगतापवाडी, हिवरे, साठेवाडी, वेलंग (शिरंबे), वेळू, वाघोली, विखळे, चवणेश्‍वर. 

या ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. ग्रामपंचायतस्तरावरील वॉर्ड प्रस्ताव तयार करण्याचे काम २७ जूनला संपल्यानंतर गावपुढाऱ्यांना थोडी उसंत मिळाली आहे. आज प्रसिद्ध होणाऱ्या वॉर्ड प्रस्तावांच्या प्रारूपावर उद्यापासून ११ जुलैपर्यंत हरकती दाखल करण्यास मुदत आहे. त्यामुळे गावपातळीवर जुळवलेली वाडा, भावकीची समीकरणे कायम राखण्यासाठी गावपुढाऱ्यांची पुन्हा धावपळ सुरू झाली आहे. सरपंचपद खुले असलेल्या खेड, नागझरी, सोनके, वाघोलीसह १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीने लढल्या जातील, असे चित्र सध्या तरी दिसत आहे. गावपातळीवरील स्थानिक गटांमध्येच होणाऱ्या या निवडणुकांवर राजकीय पक्षांचाही प्रभाव राहतोच. परिणामी काँग्रेस, राष्ट्रवादी या पारंपरिक पक्षांमधील ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासंदर्भातील दावे- प्रतिदाव्यांचे युद्ध या वेळीही पाहायला मिळणार असून, त्यात शिवसेना, भारतीय जनता पक्षाचीही भर पडणार आहे.

तीन ऑगस्टला अंतिम वॉर्डप्रस्ताव
प्रारूप वॉर्ड प्रस्तावांवर येत्या ११ तारखेपर्यंत दाखल झालेल्या हरकती सुनावणीसाठी प्रांताधिकाऱ्यांपुढे ठेवल्या जाणार आहेत. त्याठिकाणी सुनावणी झाल्यानंतर सर्व हरकती जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवल्या जातील. तेथे जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर तीन ऑगस्टला अंतिम वॉर्ड प्रस्ताव प्रसिद्ध होणार आहे.

Web Title: koregav news 54 grampanchyat election