कोरेगावात झाकलेली गटारे, हीच समस्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

गतवर्षीच्या ‘डेंगी’ची पुनरावृत्ती टाळण्यासह एकूणच शहर स्वच्छतेचे आव्हान

गतवर्षीच्या ‘डेंगी’ची पुनरावृत्ती टाळण्यासह एकूणच शहर स्वच्छतेचे आव्हान

कोरेगाव - नगरपंचायतीत पदाधिकारी व प्रशासनाचा सूर जुळेनासा झाल्यामुळे उपाययोजनांअभावी शहरातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. झाकलेल्या गटारांवर वरवरची स्वच्छता दिसते खरी; परंतु झाकणाखाली कचरा तसाच साचून राहात असल्याने तुंबलेल्या गटारांतून सांडपाण्याच्या निचऱ्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे झाकलेली गटारे, हीच एक समस्या बनली असून, गेल्या वर्षीच्या डेंगीच्या साथीची पुनरावृत्ती टाळण्याचे आणि एकूणच शहरातील स्वच्छतेचे आव्हान पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर नगरपंचायतीपुढे उभे ठाकले आहे.

नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर निवडणूक झाली. पदाधिकाऱ्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर मासिक बैठकांमधून विकासकामांचे ठराव होऊ लागले. काही कालावधीतच पदाधिकारी विरुद्ध मुख्याधिकारी, अशा संघर्षाला प्रारंभ झाला. त्यामुळे अनेक ठरावांची अंमलबजावणी रखडली. दरम्यान, मुख्याधिकारी पूनम कदम दीर्घ रजेवर गेल्या. त्यानंतर रहिमतपूर नगरपालिकेचे मुध्याधिकारी सव्वाखंडे यांच्याकडे येथील अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. त्यांच्या बदलीनंतर नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी गोसावी यांच्याकडे सध्या येथील अतिरिक्त कार्यभार आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील स्वच्छतेच्या समस्येवर अद्यापही ठोस उपाय निघू शकला नाही. कुठे तरी उघडे असलेले गटार स्वच्छ केल्याचे दिसते. अनेक ठिकाणची गटारे झाकलेली असल्यामुळे त्याखालील स्वच्छता नीट होत नाही. परिणामी गटारे तुंबून राहतात आणि सांडपाण्याचा निचरा होत नाही. याच कारणामुळे गेल्या वर्षी शहरात डेंगीची साथ पसरली होती.

नवीन फॉगिंग मशिन खरेदी करण्याचा ठराव पदाधिकारी, नगरसेवकांनी केला आहे; परंतु प्रशासनाकडून अद्याप अंमलबजावणी झाली नाही. शहरात ३२ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची युनिट आहेत. त्यापैकी अनेक युनिटची दुरवस्था असल्याने वैयक्तिक स्वच्छतागृह नसलेल्यांची गैरसोय व कुचंबणा होते. स्वच्छतेचे काम करणारे दहा कर्मचारी कायम नाहीत. त्यांच्या मागील वेतनाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. तरीही त्यांच्यावरच स्वच्छतेची सारी भिस्त आहे. स्वच्छतेसाठी ठेका पद्धतीचा अवलंब करून त्यात या दहा कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी निविदा मागवली होती; परंतु तेही काम मागे पडल्याचे दिसते.

प्रशासनातील विसंगतीमुळे संभ्रमावस्था
आतापर्यंतच्या कार्यकालात एक मुख्याधिकारी आणि दोन प्रभारी मुख्याधिकारी, अशा तीन अधिकाऱ्यांनी कामकाज पाहिल्याचे नमूद करून नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे म्हणाले, ‘‘फॉगिंग मशिन खरेदी व स्वच्छतेसाठी ठेका पद्धतीसंदर्भात तिन्ही अधिकाऱ्यांचे मत विसंगत व संभ्रमात टाकणारे आहे. प्रत्येक अधिकाऱ्याचा नवीन नियम, त्यामुळे नागरिकांना सुविधा देणे मुश्‍कील झाले आहे.’’

Web Title: koregav satara news dranage issue