‘कोटेश्‍वर’साठी शाहूपुरीवासीय वेठीला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

सातारा - कोटेश्‍वर पुलाचे काम रखडल्याने शाहूपुरीवासीयांना वेठीस धरले जात आहे. पालिकेने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर खोदलेल्या पुलामुळे शाहूपुरीवासीयांना रोज दोन किलोमीटरचा हेलपाटा मारावा लागत आहे. जवळचा मार्ग म्हणून काही नागरिक खोदलेल्या पुलाच्या कडेने जात आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता वाढली आहे. 

सातारा - कोटेश्‍वर पुलाचे काम रखडल्याने शाहूपुरीवासीयांना वेठीस धरले जात आहे. पालिकेने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर खोदलेल्या पुलामुळे शाहूपुरीवासीयांना रोज दोन किलोमीटरचा हेलपाटा मारावा लागत आहे. जवळचा मार्ग म्हणून काही नागरिक खोदलेल्या पुलाच्या कडेने जात आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता वाढली आहे. 

साताऱ्यातून शाहूपुरीकडे जाण्यासाठी कोटेश्‍वर मंदिर ते अर्कशाळामार्गे गेंडामाळ हा जवळचा व रहदारीचा रस्ता आहे. सातारा पालिकेने या रस्त्यावरील कोटेश्‍वर पूल रुंदीकरण व पुनर्बांधणीसाठी उखडला. हे काम करत असताना त्याठिकाणी कोटेश्‍वर टाकीत पाणी घेऊन जाणारी जलवाहिनी आडवी आली. ही जलवाहिनी स्थलांतर करेपर्यंत अवधी गेला. त्यानंतर ठेकेदाराने पुलाचे खोदकाम हाती घेतले. त्यावेळी रस्त्याखाली शुक्रवार पेठ व परिसरास पाणी वितरण करणाऱ्या आणखी तीन जलवाहिन्या आढळून आल्या. या जलवाहिन्या बदलण्यापूर्वी तांत्रिक मंजुरी व खर्चास मान्यता घेईपर्यंत कालापव्यय झाला. 

अद्याप या पुलाचे काम अपूर्ण आहे. हे काम करताना पुलावर पायवाट ठेवली. सध्या पादचारी, सायकलचालक या पायवाटेचा वापर करत आहेत. कोटेश्‍वर टाकी, अर्कशाळा या परिसरातील रहिवासी व व्यावसायिकांना या पायवाटेचाच आधार आहे. नुकताच पाऊस सुरू झाल्याने ही वाट निसरडी झाली आहे. गेल्या काही दिवसांत रस्त्यावरून घसरून पादचाऱ्यांना लहान-मोठी दुखापत झाली आहे. त्यामुळे आणखी किती महिने पालिका नागरिकांना कसरत करायला लावणार, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. 
दीड महिन्यापासून कोटेश्‍वर पूल रहदारीसाठी बंद असल्याने शाहूपुरीवासीयांना शहरात यायचे झाल्यास बुधवार नाका अथवा अनंत इंग्लिश स्कूलमार्गे जावे लागते. खरं तर शाहूपुरीवासीयांना राजवाड्याकडे अथवा राधिका रस्त्याला यायचे झाल्यास कोटेश्‍वर पूल हा जवळचा रस्ता आहे. पालिकेने पाऊस थांबल्यानंतर प्राधान्याने पुलाचे काम करून तो लवकर रहदारीसाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे.

पुलाच्या रेंगाळलेल्या कामामुळे परिसरातील व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पालिकेने कामाचा वेग वाढवावा, अन्यथा जनआंदोलन छेडावे लागेल.
- जयेंद्र चव्हाण, माजी नगरसेवक

Web Title: koteshwar bridge work issue