लोकांच्या देणगीतून उभारलेय कोविड हॉस्पिटल, शुक्रवारी सांगलीत होणार उद्‌घाटन 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 September 2020

समाजाने हातभार लावून उभे केलेले, अत्याधुनिक सुविधांसह 50 खाटांचे श्री भगवान महावीर कोविड केअर सेंटर शुक्रवार (ता. 4) सुरु होत आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन होईल. सिव्हिल हॉस्पिटलजवळ डॉ. वाळवेकर रुग्णालयात हे कोविड केअर सेंटर चालवले जाणार आहे.

सांगली ः समाजाने हातभार लावून उभे केलेले, अत्याधुनिक सुविधांसह 50 खाटांचे श्री भगवान महावीर कोविड केअर सेंटर शुक्रवार (ता. 4) सुरु होत आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन होईल. सिव्हिल हॉस्पिटलजवळ डॉ. वाळवेकर रुग्णालयात हे कोविड केअर सेंटर चालवले जाणार आहे. अशा पद्धतीच्या रुग्णालयाचा राज्यभर एक आदर्श पॅटर्न बनावा, अशी अपेक्षा प्रमुख संयोजक सुरेश पाटील आणि डॉ. रवींद्र वाळवेकर यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 

ते म्हणाले, ""या सेंटरमध्ये 13 बेड आयसीयू, 6 वेंटीलेटर, 7 हायफ्लो नेझन ऑक्‍सिजन मशीन अशा सुविधा उभ्या केल्या आहेत. येथे रुग्णाला संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्व ती यंत्रणा उपलब्ध केली जाईल. डॉ. रवींद्र वाळवेकर, डॉ. बी. एस. पाटील, डॅ. अविनाश झळके, डॉ. दिनेश बभान, डॉ. अमोल पाटील, डॉ. सुशील तिपन्नावर, डॉ. सुहास वाडकर, डॉ. सुधीर मगदूम, डॉ. प्रीतम अडसूळ अशी डॉक्‍टरांची टीम कार्यरत आहे. कोरोनाचे संकट गडद होत असताना सामाजिक बांधिलकीतून हा प्रयत्न आहे. खूपजण मदतीला हात देत आहे. येथे गरीब रुग्णांना शुल्कामध्ये सवलत दिली जाईल. प्रख्यात व्यापारी दिवंगत नरेश शहा यांचे नाव आयसीयू विभागाला दिले आहे.'' 

ते म्हणाले, ""लोकांनी देणगी स्वरुपात येथे साहित्य पुरवठा केला. कोरोनाचे संकट संपल्यानंतर साहित्य वेगेवेगळ्या धर्मादाय रुग्णालयांना देऊ. श्री राधेकृष्णा एक्‍सट्रॅक्‍शन, राजेंद्र घोडावत, सुरेश पाटील, सुभाष बेदमुथा, वसंतलाल शाह, ओसवाल बंधू, जैन समाज प्रतिष्ठान, गिरिष चितळे, मकरंद चितळे, अशोक बाफना, मुन्ना मुंदडा, चंदुकाका सराफ, अजित पाचोरे, संभाजी चव्हाण, प्रथमेश कन्स्ट्रक्‍शन, विद्यासागरजी प्रतिष्ठान, श्रीमंत बदनिकाई, श्‍यामसुंदर तोष्णीवाल, दीपक बटेजा, सुभाष शहा, रावसाहेब लठ्ठे, सहजानंद ट्रेडिंग, परेश मकिम, श्‍यामसुंदर तोष्णीवाल, दीपक बजेटा, संदीप व विनोद कोठारी, देवेंद्र मेहता, फ्रेंड कपल ग्रुप, जितेंद्र टेक्‍सटाईल, सचिन पिसे, जैन मित्र मंडळ आदींनी मदतीचा हात दिला आहे.'' 
यावेळी जितेंद्र नाणेशा, सुभाष बेदमुथा, अजित पाचोरे उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kovid Hospital, built with the donation of people, will be inaugurated in Sangli on Friday