कोवाड हल्लाप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या जिल्हाध्यक्षांची चौकशी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

बेळगाव - धर्मांतराच्या संशयावरून रविवारी कोवाड (ता. चंदगड) येथे प्रार्थनास्थळावर झालेल्या सशस्त्र हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष रविकुमार कोकितकर यांची चौकशी केली. सोमवारी (ता. २४) कोल्हापूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी त्यांची कोवाड पोलिस ठाण्यात पहाटे दोनपर्यंत चौकशी केली.

बेळगाव - धर्मांतराच्या संशयावरून रविवारी कोवाड (ता. चंदगड) येथे प्रार्थनास्थळावर झालेल्या सशस्त्र हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष रविकुमार कोकितकर यांची चौकशी केली. सोमवारी (ता. २४) कोल्हापूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी त्यांची कोवाड पोलिस ठाण्यात पहाटे दोनपर्यंत चौकशी केली. त्यानंतर तपासाला सहकार्य करण्याची हमी घेऊन कोकितकर यांना सोडले. दरम्यान, याप्रकरणी गुरुवारी (ता. २७) शहारातील दोघा तरुणांना ताब्यात घेतले आहे.

कोवाड येथील घटनेनंतर महाराष्ट्र आणि बेळगाव पोलिसांची धावपळ उडाली होती. कोवाड पोलिसांनी घटनेची नोंद करून घेऊन तपास चालविला आहे. हल्लेखोर बेळगावातील असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस बेळगावात तळ ठोकून आहेत. बेळगावकडे येणाऱ्या सर्व मार्गांवरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी तपासासाठी बेळगाव पोलिसांचे सहकार्य घेतले आहे. त्यांनी त्याठिकाणी पोलिस आयुक्‍त कार्यालय गाठून सविस्तर माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, घटना घडलेल्या दुसऱ्याच दिवशी रविकुमार कोकितकर यांना प्रथम बेळगाव पोलिस आयुक्‍तालयात बोलाविण्यात आले. त्यानंतर चंदगड पोलिस ठाण्यात व कोवाड येथे जिल्हा पोलिस प्रमुखांच्या समक्ष त्यांची चौकशी करण्यात आली.

कोवाड प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे कोकितकर यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यान, पोलिस तपासाला सहकार्य करण्याची हमी दिल्यानंतर कोकितकर यांची पहाटे दोन वाजता सुटका करण्यात आली. त्यानंतरही पोलिसांनी बेळगावात चौकशी सुरूच ठेवली आहे. गुरुवारी (ता. २७) शहरातील मध्यवर्ती भागातील दोघा संशयित तरुणांना महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. 

Web Title: Kowad attack incidence follow up