कोयना धरणात तेवीस दिवसांतच ५४ टीएमसी पाणी

जालिंदर सत्रे
गुरुवार, 19 जुलै 2018

कोयना धरण क्षेत्रात दमदार पाऊस; ७२ फुटांनी वाढली पाणीपातळी
पाटण - कोयना धरण परिसरात मॉन्सूनच्या पावसाने २५ जुलैपासून दमदार हजेरी लावतानाच त्यात सातत्य राहिल्याने धरणाच्या पायथा व सांडव्यावरून पाणीसाठा नियंत्रणासाठी पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. गेल्या २३ दिवसांत पाणीपातळी ७२ फुटांनी व पाणीसाठ्यात ५४ टीएमसीने वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३०.७७ टीएमसी जादा पाणीसाठा झाला आहे.

कोयना धरणाचे जलवर्ष एक जूनला सुरू होते. त्या दिवशी धरणात २९.४० टीएमसी पाणीसाठा होता. दोन, आठ व नऊ जूनचा अपवाद सोडला तर २२ जूनपर्यंत पावसाने दडी मारली. २३ जूनला रिमझिम व २५ जुलैपासून संततधार व मुसळधार पावसात सातत्य राहिल्याने गतवर्षी १८ जुलै रोजी जलाशयाची पाणीपातळी २१०६.०६ व पाणीसाठा ४९.३८ टीएमसी होता. आज पाणीपातळी २१४१ फूट व पाणीसाठा ७९.८५ टीएमसी झाला आहे. पायथा वीजगृहातून ०.१८ व सांडव्यावरून ०.१२ टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला असून दोन्हींचा फरक पाहिला तर पाणीपातळी गतवर्षापेक्षा ३४.०५ फुटांनी व पाणीसाठा ३०.७७ टीएमसीने जास्त आहे.

गेल्यावर्षी १८ जुलैपर्यंत कोयनानगरला १९७०, नवजाला २२९० व महाबळेश्वरला १९९७ मिलिमीटर पाऊस पडला होता. यावर्षी कोयनानगरला २९२४, नवजाला २९७२ व महाबळेश्वरला २६२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत आजअखेर कोयनानगरला ९५४, नवजाला ६८२ व महाबळेश्वरला ६३० मिलिमीटर जादा पावसाची नोंद झाली आहे. या तीन ठिकाणची सरासरी पाहिली तर ७५५ मिलिमीटर जादा पाऊस यावर्षी झालेला दिसतो.

कोयना धरणात एक जूनला २९.४० टीएमसी पाणीसाठा होता. तेव्हापासून आजपर्यंत जलाशयात ५६.४४ टीएमसी पाणीसाठ्याची आवक झाली असून एक ते २४ जूनपर्यंत फक्त एक टीएमसी व २५ जूनपासून १८ जुलैपर्यंत ५४ टीएमसी पाण्याची आवक झालेली दिसते. गतवर्षी २८ जुलैला कोयना धरणाने ८० टीएमसीचा टप्पा पार केल्याने २९ जुलैला पायथा वीज गृहातून व ३० जुलैला सहा वक्र दरवाजांतून कोयना नदीत पाणी सोडले होते. यावर्षी मुसळधार पावसाने १३ दिवस अगोदरच धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय व्यवस्थापनाला घ्यावा लागला.

Web Title: koyana dam rain water water storage