‘कोयना’त ११ टीएमसी जादा साठा

जालिंदर सत्रे
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

पाटण - काही अपवाद वगळता २३ जूनपासून सातत्याने पाऊस सुरू असल्याने कोयना धरणाचा पाणीसाठा शंभर टीएमसीच्या उंबरठ्यावर आहे. पाणीपातळी २१५८.०६ फूट व एकूण पाणीसाठा ९८.७८ टीएमसी असून गतवर्षीच्या तुलनेत ११ टीएमसी पाणीसाठा जास्त आहे. पाणीसाठा नियंत्रणासाठी सांडव्यावरून दुसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.  

पाटण - काही अपवाद वगळता २३ जूनपासून सातत्याने पाऊस सुरू असल्याने कोयना धरणाचा पाणीसाठा शंभर टीएमसीच्या उंबरठ्यावर आहे. पाणीपातळी २१५८.०६ फूट व एकूण पाणीसाठा ९८.७८ टीएमसी असून गतवर्षीच्या तुलनेत ११ टीएमसी पाणीसाठा जास्त आहे. पाणीसाठा नियंत्रणासाठी सांडव्यावरून दुसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.  

एकूण १०५.२५ टीएमसी पाणीसाठा क्षमता असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेले ५० दिवस सातत्याने मुसळधार, संततधार तर कधी रिमझिम पाऊस पडत असल्याने कोयना व  नवजाला चार हजार मिलिमीटरचा टप्पा पावसाने ओलांडला आहे. आजपर्यंत कोयनानगरला ४०८१ मिलिमीटर, नवजाला ४१४६ व महाबळेश्वरला ३६१३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून गतवर्षीच्या तुलनेत ती जास्त आहे. गतवर्षीच्या तुलनेत ६.४० टीएमसी पाणीसाठा जास्त असून पूर नियंत्रणासाठी पायथा वीजगृह व सांडव्यावरून १४.१९ टीएमसी पाणी कोयना नदीपात्रात सोडून दिले आहे. जलाशयाचा एकूण पाणीसाठा ८३.९५ टीएमसी असून धरणात जलवर्षात ७५.३० टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. 

पाणीसाठा ७७.९२ टीएमसी झाल्यानंतर धरण व्यवस्थापनाने पाणीसाठा नियंत्रणासाठी १७ जुलै रोजी पायथा वीजगृह व सहा वक्र दरवाजे उचलून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरवात केली. नऊ दिवस सांडव्यावरून व २३ दिवस पायथा वीजगृहातून पाणीसाठा नियंत्रणासाठी कोयना नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. पाच जुलैला पुन्हा पायथा वीजगृहातून विसर्ग करण्यास सुरवात केली आहे. एक जूनपासून धरणात ९३.९९ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. पाणीसाठा नियंत्रणासाठी १७ जुलैपासून पायथा वीजगृहातून ३.९३ टीएमसी व सहा वक्र दरवाजांच्या सांडव्यावरून १२.६६ टीएमसी असा १६.५९ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. एक जूनपासून आजपर्यंत पश्‍चिमेकडे वीजनिर्मितीसाठी १०.१६ टीएमसी व पूर्वेकडे १.७३ टीएमसी पाण्याचा वापर पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून सिंचनासाठी करण्यात आला आहे.

पाणीपातळीसह पाणीसाठाही जास्त
गत वर्षी जलाशयाचा पाणीसाठा ८७.७५ टीएमसी व पाणीपातळी २१४९.१० फूट होती. आज पाणीसाठा ९८.७८ टीएमसी व पाणीपातळी २१५८.०६ फूट आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा नियंत्रणासाठी १६.५९ टीएमसी पाणी सोडूनही पाणीपातळी ८.८ फूट व पाणीसाठा ११.०३ टीएमसीने जास्त आहे.

Web Title: koyana dam water 11 TMC extra water