कोयना जलाशयाची पाणीपातळी नीचांकी

तापोळा - कोयना नदीवरील शिवसागर जलाशयाची पाणीपातळी कमी झाल्याने पात्रात विसावा घेणाऱ्या बोटी.
तापोळा - कोयना नदीवरील शिवसागर जलाशयाची पाणीपातळी कमी झाल्याने पात्रात विसावा घेणाऱ्या बोटी.

कास - महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना नदीवरील शिवसागर जलाशयाची पाणीपातळी निचांकी स्तरावर गेली असून, १०५ टीएमसी साठा असणाऱ्या या धरणातील पाणी कमी झाल्याने बामणोली, तापोळा भागातील नदीपात्र कोरडे पडले आहे. कोयना नदीला एखाद्या ओढ्याची अवकळा आल्याने स्थानिक लोकांच्या पोटापाण्यासाठी असणारा बोटिंगचा व्यवसाय ठप्प झाला आहे. 

महाराष्ट्राचे मिनी काश्‍मीर म्हणून तापोळा ओळखला जातो. शिवसागर जलाशयाचे अथांग पाणी व सभोवताली सह्याद्री पर्वतातील घनदाट जंगल यामुळे येथील निसर्गाची एक वेगळी ओळख झाली आहे. 

नदीच्या दुतर्फा असलेले सदाहरित डोंगर व मधोमध पाण्यामुळे इकडे वर्षभर पर्यटकांची पावले वळत असतात; पण यावर्षी पडलेल्या भीषण दुष्काळामुळे कोयनेच्या पाण्याचा वापर वीज, शेती व पिण्यासाठी वाढल्याने सध्या धरणात तापोळा व बामणोली भागाकडे अल्प पाणीसाठा राहिला 
आहे. 

लाँच, स्पीड बोट, पायडंल बोट अशा विविध प्रकारच्या बोटी पाण्यात पर्यटकांना सैर करत मनमुराद आनंद देतात; परंतु बहुतेक बोटी आता कोरड्या पात्रात विश्रांती घेत आहेत. नदीच्या मुख्य प्रवाहात थोडेफार पाणी असल्याने किरकोळ स्वरूपात बोटिंग सुरू आहे. त्याचा फटका पर्यटनाबरोबर या दुर्गम भागातील जनतेलाही बसत असून, नदी आटल्यामुळे या गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. 

इकडे रस्ता वाहतुकीपेक्षा जलवाहतुकीतूनच प्रवास होत असल्याने जनजीवनावरसुद्धा या पाणीबाणीचा फटका बसला आहे.

मोठा पाऊस होऊन पाणी पातळी वर येईपर्यंत हा बोट व्यवसाय व लोकांचे दळणवळण थांबणार असल्याने लोकांना कोयनामाई भरण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जावळी- महाबळेश्‍वर तालुक्‍यांतील लोकांच्या त्यागावर कोयना धरण उभे राहिले आहे. धरणात पाणीच राहत नसल्याने जनजीवन विस्कळित होत असून, शासनाने बोट चालकांना मदत करून अडचणीतून बाहेर काढावे.
- दीपक धनावडे, अध्यक्ष, शिवसागर बोट क्‍लब, तापोळा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com