निश्‍चित कालमर्यादेत मागण्या होतील पूर्ण - डॉ. भारत पाटणकर

सचिन शिंदे
बुधवार, 21 मार्च 2018

टास्क फोर्स व हाय पॉवर कमिटी स्थापन करून कोयना धरणग्रस्तांच्या मागण्या मार्गी लावण्यात येणार आहेत. त्यासाठी आम्हीही पाठपुरावा करत आहोत. ती कामे तीन महिन्यांच्या आतच झाली पाहिजेत, असा आमचा आग्रह आहे.
- डॉ. भारत पाटणकर, नेते, श्रमिक मुक्ती दल 

कोयना - कोयना धरणग्रस्तांच्या रखडलेल्या पुनर्वसनाच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बैठक घेऊन मान्य केल्या. तीन महिन्यांत सर्व मागण्या पूर्ण करावयाची कालमर्यादा निश्‍चित केली आहे. 

त्या कालबद्ध पद्धतीने मागण्या पूर्ण होतील, असा विश्वास श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केला. ठरल्यानुसार मागण्या 
पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशाराही त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधताना दिला. 

कोयना प्रकल्पग्रस्तांसाठी कालच्या बैठकीत पर्यटन व्यवसाय खुला करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. त्याद्वारे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तो व्यवसायही उपलब्ध करून दिला जाणार आहे. तालुक्‍यातील शिक्षण संस्था, कारखान्यांत प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्याचा कायदा येथे लागू केला आहे. त्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. त्या सगळ्या क्षेत्रात पाच टक्के आरक्षण ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आहे. प्रत्येक गावात वीज मोफत देण्याऐवजी सोलर सिस्टिम बसवून देण्यात येणार आहे. त्यामुळे मोफत विजेचा प्रश्नही मार्गी लागला आहे. 

कोयना जलाशयातील लाँचवरील बंदी उठवली जाणार आहे. त्यामुळे तो पर्याय व्यवसायासाठी खुला राहणार आहे. आठ गावांनी त्यांचा विकास आराखडा केला आहे. त्यालाही मंजुरी देण्यात येणार आहे.  मुलींना समान हक्क व बाधित गावांतील पात्र प्रकल्पग्रस्तांची यादीही तयार केली जाणार आहे. त्यासाठी एक मोठा कॅम्प कोयना येथे होणार आहे. ते काम महिन्यात संपावायचे आहे. त्याचे साडेचार हजार अर्ज आले आहेत. त्याची नोंद केली जाणार आहे. इको फ्रेन्डली शेती व त्या पद्धतीचे व्यवसाय करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र उपजिल्हाधिकारी नेमला जाईल, असे ठरले आहे. या सगळ्या मागण्यांसाठी तीन महिन्यांचा ‘बॉण्ड’ आहे. त्या कालावधीत ते पूर्ण करावयाचे आहे.

महत्त्वाचे निर्णय
 संचय जमीन वाटप
 वेगवेगळ्या संस्थांमध्ये धरणग्रस्तांना नोकऱ्या
 आठ गावांचा विकास आराखडा 
 पर्यटन व्यवस्थेची जबाबदारी स्थानिक गावांवर
 पुनर्वसित प्रत्येक गावात सोलर सिस्टिम
 शिवसागरातील लाँचवरील बंदी उठणार
 पहिल्या टप्प्यातील पात्र साडेचार हजार धरणग्रस्तांना संकलन यादीत घेणार
 नोकऱ्या नसणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना प्रति महिना प्रत्येकी तीन हजार रुपये

Web Title: koyana news satara news koyana dam project affected rehabilitation