आता लक्ष मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीकडे

Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis

पाटण - कोयनानगर येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणासह राज्यातील सात जिल्ह्यांत १३ ठिकाणी १२ फेब्रुवारीपासून कोयना प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. मोर्चे, आत्मक्‍लेश आंदोलन, लाँगमार्च, लाँगमार्चला स्थगिती, लोकसभेची आचारसंहिता अन्‌ आता पंढरपूरकडे पायी दिंडीचा इशारा असा या आंदोलनाचा गेली ३५ दिवस प्रवास सुरू आहे. लोकसभेचे आचारसंहिता लागलेली असतानासुद्धा डॉ. भारत पाटणकरांनी आंदोलनातील धग कायम ठेवली असून, सर्वांचे लक्ष मुख्यमंत्र्यासोबत होणाऱ्या बैठकीकडे लागले आहे.

सात दशके प्रलंबित असणाऱ्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त गेल्या वर्षी २३ दिवस व यावर्षी कोयनानगरसह राज्यात १३ ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहेत. गेल्या वर्षी २३ दिवस झालेल्या ठिय्या आंदोलनात शासनाने घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीस प्रशासन टाळाटाळ व चालढकल करीत असल्याचा प्रकल्पग्रस्तांचा आरोप असून, त्यामध्ये तथ्य आहे. 

संकलन यादी तयार करण्यास झालेला उशीर यामधून ते सिद्ध होते. १२ फेब्रुवारीला मोर्चा काढून श्रमिक मुक्ती दलाच्या भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलनास सुरवात झाली. त्यानंतर महसूल भवन, पाटबंधारे विभाग, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून शासनावर दबाव व प्रकल्पग्रस्तांमध्ये जागृती कायम ठेवली. आत्मक्‍लेश आंदोलन व दोन मार्चला लाँगमार्च काढण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या.

त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांचे बैठकीचे पत्र आंदोलनस्थळी दिल्याने लाँगमार्चला स्थगिती देऊन डॉ. पाटणकर यांनी बैठक होईपर्यंत ठिय्या चालू राहणार असल्याचे जाहीर करून प्रशासनाला कोंडीत पकडले. 

पुन्हा आंदोलनाचे दिवस वाढू लागले आणि लोकसभेची आचारसंहिता दहा मार्चला सायंकाळी घोषित झाली. आचारसंहितेचा आंदोलनावर परिणाम होईल, या भीतीपोटी प्रकल्पग्रस्तांच्यात संभ्रमावस्था होती. त्यामुळे डॉ. पाटणकरांनी आंदोलनाची दिशा बदलली व २१ मार्चपूर्वी बैठक झाली नाही, तर १३ ठिकाणी ठिय्या देऊन बसलेले प्रकल्पग्रस्त भागवत धर्माची पताका घेऊन पायी दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान करतील, असा इशारा देऊन आंदोलनाचा दबाव कायम ठेवला. 

आज आंदोलनाला ३५ दिवस पूर्ण होत आले आहेत. त्यामुळे या तीन दिवसांत बैठकीचे नियोजन झाले नाही, तर प्रकल्पग्रस्त पांडुरंग हरीचा गजर करणार असे चित्र असले, तरी गेली ३५ दिवस १३ ठिकाणी चाललेल्या ठिय्या आंदोलनाची धग कायम ठेवण्यात डॉ. पाटणकरांनी यश मिळविले आहे.

प्रकल्पग्रस्तांची सत्त्वपरीक्षा! 
हजारो कोयना प्रकल्पग्रस्त घरे- दारे सोडून ३५ दिवस राज्यातील १३ ठिकाणी आंदोलन करीत आहेत. राज्यासाठी सर्वस्वाचे बलिदान देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांना बैठकीसाठी ३५ दिवसांत वेळ मिळत नाही, की कोणी जाणून-बुजून प्रकल्पग्रस्तांची सत्त्वपरीक्षा घेते आहे, याबाबत प्रकल्पग्रस्तांमध्ये संशयाचे वातावरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com