कोयनेत वीजनिर्मितीसाठी मुबलक पाणी

सचिन शिंदे
मंगळवार, 28 मार्च 2017

पावसाळा सुरू होईपर्यंत चिंता नसल्याचा धरण व्यवस्थापनाचा दावा

पावसाळा सुरू होईपर्यंत चिंता नसल्याचा धरण व्यवस्थापनाचा दावा
कऱ्हाड - उन्हाळा म्हटले, की पाणीटंचाई आणि विजेचे भारनियमन आलेच, अशी काहीशी स्थिती मागील काही वर्षांत होती. यंदा मात्र कोयना धरणात मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत तरी पुरेशी वीजनिर्मिती होईल. त्यात खंड पडणार नाही, अशी माहिती धरण व्यवस्थापनाने "सकाळ'ला दिली.

धरणात सध्या 45.45 टीमएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी या दिवशी पाणीसाठा अवघा 39.86 टीएमसी इतका होता. त्यामुळे यंदा 5.59 टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. अर्थात, त्याच्या वापराचे योग्य नियोजन सुरू आहे.

दर वर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर नेहमीच धरणातील पाणीसाठा कमी होत असतो. यंदा तशी स्थिती नसल्याने वीजनिर्मिती आणि शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न बऱ्यापैकी निकालात निघणार आहे.

पोफळीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातून यंदा अनुक्रमे 1037.88 व 1025.88 मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. धरणाच्या पायथा वीजगृहातून 117.504 मेगावॉट वीजनिर्मिती झाली आहे. सध्याच्या पाणीसाठ्यातून पोफळीला अकरा, पायथ्याला सहा टीएमसी पाणीसाठा द्यावयाचा आहे. तो देऊनही कोयना धरणात पाणीसाठा शिल्लक राहतो आहे. त्यातील पाच टक्के पाणी वीजनिर्मितीसाठी सोडले, तरी तीस टक्के पाणी शिल्लक राहते. त्यामुळे आगामी दोन महिन्यांत वीज निर्मितीवर परिणाम होणार नाही.

कोयना धरणात एक जूनपासून आजअखेर सुमारे 144.75 टीएमसी पाण्याची आवक झाली. त्यापैकी वीजनिर्मितीसाठी पोफळीला 67. 50 टीएमसी व पायथा वीजगृहाला 27.50 टीएमसी पाणी दिले गेले. धरणाच्या पूर्वेकडील शेतीसाठी आजअखेर 21.15 टीएमसी पाणी एक जूनपासून वापरले गेले.

'कोयना धरणात यंदा गेल्या वर्षापेक्षा सुमारे साडेपाच टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. त्यामुळे यंदा वीजनिर्मितीत काही अडचण येईल, अशी स्थिती नाही, तरीही पाण्याचे योग्य नियोजन सुरू आहे.''
- ज्ञानेश्‍वर बागडे, कार्यकारी अभियंता, कोयना धरण

Web Title: koyana water electricity generation