#KrishnaFlood लाखोंचे पशुधन महापुराने हिरावले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

मिरज - कृष्णेच्या महापुरात लाखो रुपये किंमतीची जनावरे वाहून गेली आहेत. कृष्णाघाटावर शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर जनावरांनी पाण्यात प्राण सोडले. अनेक शेतकऱ्यांनी इमारतीच्या चक्क तिसऱ्या मजल्यावर जनावरे नेऊन बांधली आहेत.

मिरज - कृष्णेच्या महापुरात लाखो रुपये किंमतीची जनावरे वाहून गेली आहेत. कृष्णाघाटावर शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर जनावरांनी पाण्यात प्राण सोडले. अनेक शेतकऱ्यांनी इमारतीच्या चक्क तिसऱ्या मजल्यावर जनावरे नेऊन बांधली आहेत.

कृष्णाघाटावर महापुराने थैमान माजवले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने गावातच थांबलेले शेतकरी व जनावरे अडकून पडली. मंगळवारी सकाळी एक गाय पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु होता. उसळणाऱ्या लाटांना पाहून ती घाबरली, दाव्याला हिसडा देऊन उधळली आणि थेट कृष्णेच्या वेगवान प्रवाहात शिरली. मालकाच्या डोळ्यांसमोर पाहता पाहता नाहीशी झाली.
नदीकाठी काहींनी पाणी वाढत असल्याचे पाहून दावी रिकामी केली. त्यातील काही जनावरे हाताला लागली, तर उर्वरीत नदीच्या आहारी गेली. 

कृष्णाघाटावर प्राथमिक शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर सत्तरहून अधिक जनावरे बांधण्यात आली आहेत. अरुंद जिन्यातून त्यांना ढकलत शेतकऱ्यांनी वर नेले. तेथेच त्यांच्या चारा-पाण्याची तजवीज केली आहे. महापुराने रिकाम्या झालेल्या कृष्णाघाट गावात आता गल्लोगल्ली कुलूपबंद घरे, वरच्या मजल्यावर जनावरे आणि त्यांच्या राखणीसाठी थांबलेले पाच - पंचवीस शेतकरी असे थबकवणारे चित्र दिसते.

ढवळी गावातील हजारो जनावरे शेतकऱ्यांनी पै - पाहुण्यांकडे नेऊन बांधलीत. पुराचा अदमास येताच गावकर्यांनी चोवीस तासांत गाव रिकामे केले. काहींनी जवळच्या वड्डी गावात आश्रय घेतला. जनावरांची सोय बेडग, आरग, टाकळी, बोलवाड, मालगाव आदी गावांत मित्र व पाहुण्यांकडे केली. मिरजेत जनावर बाजारातही बाजार समितीच्या मदतीने शेकडो जनावरांच्या चारा-पाण्याची सोय झाली आहे. 

पूरग्रस्त आता दुष्काळी गावांत आश्रयाला, नदीकाठापेक्षा दुष्काळी गावात जन्म परवडला. एरवी दुष्काळाने पिचणाऱ्या मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांवर आता पूरग्रस्तांची जबाबदारी येऊन पडली आहे. ढवळी, कृष्णाघाट, म्हैसाळसह पश्चिम भागातील पूरग्रस्त शेतकरी व जनावरे दुष्काळी गावात आश्रयाला आली आहेत. नदीकाठापेक्षा दुष्काळी गावात जन्मलाले बरे अशी प्रतिक्रिया कृष्णाघाट येथील तरुण शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Krishana Flood livestock missing in flood