महापुराने तुटला कृष्णा-कोयनेचा काठ

हेमंत पवार
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

भरीव भरपाईची मागणी
आत्तापर्यंत आलेल्या महापुरात यावेळचा महापूर मोठा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच पाण्यालाही मोठा वेग असल्याने त्याबरोबर नदीकाठची शेती पिकांसकट वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून नुकसानीच्या आकड्यांचा विचार करून त्यातुलनेत भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कऱ्हाड - कृष्णा-कोयना नद्यांना आलेल्या महापुराबरोबर नदीकाठही वाहिल्याचे वास्तव पूर ओसरल्यानंतर समोर आले आहे. पुराच्या पाण्याच्या मोठ्या लोटांच्या प्रवाहाने नदीकाठही मोठ्या प्रमाणात तुटला असून, त्यावरील जमीन पिकांसकट वाहून गेली आहे. पुराने अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर हे नवीन संकट उभे राहिल्याने ते हवालदिल झाले आहेत. नदीकाठची ही स्थिती मात्र नदीकाठावरील नागरी वस्त्यांना धोक्‍याची घंटाच ठरली आहे. 

सलग दोन आठवड्यापासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेले पाणी यामुळे कोयना-कृष्णा नद्यांना महापूर आला. त्यामुळे नदीकाठची पिके पूर्णतः पाण्यात गेली. त्यातच पाण्याचा प्रवाह वेगाने वाहत असल्यामुळे पाण्याबरोबर नदीकाठची मळीची जमिनीही पिकांसकट वाहून गेली आहे. सलग पाच दिवसांहून अधिक काळ महापुराच्या फटक्‍यात जमीन वाहत राहिल्याने पूर ओसरल्यानंतर नदीची पाणीपातळी पूर्ववत होत असताना हे वास्तव समोर आले आहे.

नदीकाठच्या मळीच्या शेतजमिनीही वाहिल्याने शेतकऱ्यांपुढे नवीनच संकट उभे राहिले आहे. अगोदरच पिके पाण्याखाली राहिल्याने ती हातची गेली आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. त्यातच जमिनीबरोबर पिकेही वाहिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नद्यांच्या काठी नदीपात्र तुटून ते नागरी वस्तीकडे सरकू लागले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरी वस्त्यांनाही धोका निर्माण झाला असून, ती नागरी वस्तीसाठी धोक्‍याची घंटाच ठरली आहे.   

शेतीपंपही गेले वाहून 
कोयना-कृष्णा नदीपात्रात पाच ते नऊ ऑगस्ट दरम्यान अचानक चौपटीने पाणी वाढले. त्यामुळे ते पाणी पात्राबाहेर येऊन नागरी वस्तीत घुसले. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना शेतीपंपाच्या मोटारी काढायलाही संधी मिळाली नाही. पहिल्यांदा पाणी अचानक मोठ्या प्रमाणात आल्याने मोटारी काढायला तिथपर्यंत जाताच आले नाही. त्यामुळे नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या मोटारीही वाहून जावून मोठे नुकसान झाले आहे.

कृष्णा नदीकाठी माझी शेतजमीन आहे. नदीला आलेल्या महापुराच्या पाण्याच्या प्रवाहाने माझी २० गुंठ्यातील शेतजमीन सुमारे ३० फूट खोल अशी वाहून गेली आहे. अन्य शेतकऱ्यांचीही जमीन वाहिली आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने भरपाई देवून शेतकऱ्यांना उभे राहण्यास मदत करावी.  
- अजय घाडगे, शेतकरी, शिवडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Krishna Koyana River Side Break by Flood