नृसिंहवाडीत दुसरा दक्षिणद्वार सोहळा

नृसिंहवाडीत दुसरा दक्षिणद्वार सोहळा

नृसिंहवाडी - येथील दत्त मंदिरात आषाढी कृष्ण एकादशी तिथीदिनी मोसमातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा सकाळी पावणेसातला झाला. दोन दिवसांत ३५ फूट पाणी वाढल्याने मंदिर निम्मे पाण्याखाली गेले आहे. दक्षिणद्वार सोहळ्याच्या निमित्ताने भाविकांनी स्नानाच्या पर्वणीचा आनंद घेतला. उत्सवमूर्ती श्री नारायण स्वामींच्या मंदिरात नेण्यात आली.

मोसमातील पहिले दक्षिणद्वार गेल्या महिन्यात झाले होते. पंचगंगा व कृष्णा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी सुमारे ३५ फुटांनी वाढल्याने अल्पावधित दक्षिणद्वार सोहळा होण्याची ही अलीकडच्या काळातील पहिली वेळ आहे. काही भाविक नदी पात्रात उतरून मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत आहेत.

दत्त मंदिरात रविवारी पहाटे षोडशोपचार पूजा व काकड आरती झाली. सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत पंचामृत महाभिषेक झाला. साडेबाराला श्रींच्यासमोर महापूजा झाली. विशेषतः महिला भाविकांची लक्षणीय गर्दी होती. त्यानंतर महाआरती झाली. दुपारी तीन ते चार वेळेत पवमान पंचसूक्त पठण झाले. सायंकाळी सात वाजून ३० मिनिटांनी पंचोपचार पूजा झाली. रविवार सुटी असल्याने भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- अनंत पुजारी, दत्तात्रय पुजारी,
दत्त सेवेकरी,
नृसिंहवाडी

दरम्यान, आज सकाळी पावणेसातला या मोसमातील दुसरे दक्षिणद्वार झाले. अनेक भाविकांनी साप्ताहिक सुटीचा विशेष उपयोग करून दर्शनाबरोबर स्नानाच्या पर्वणीचा आनंद घेतला. जवळजवळ मंदिराचा निम्मा भाग पाण्याखाली गेल्याने सहा फूट पाणी मंदिरात आहे. उत्सवमूर्ती वरच्या बाजूला नारायण स्वामींच्या मंदिरात ठेवलेली असून, दिवसभर अनेक प्रकारचे धार्मिक विधी येथे होत आहेत. देवस्थानचे अध्यक्ष रामकृष्ण पुजारी व सचिव अमोल विभूते यांनी भाविकांच्या संरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर बॅरिकेड्‌स उभे केले आहेत. 

दत्त मंदिरात ज्या पद्धतीने विविध धार्मिक कार्यक्रम होतात, त्याच पद्धतीने नदीचे पात्र वाढल्यानंतर नारायण स्वामींच्या मंदिरात उत्सव मूर्ती स्थापित करून सर्व धार्मिक विधी दिवसभर सुरू होते.

तुळशी जलाशयात ६७ टक्के साठा
धामोड : तुळशी जलाशयात ६१०.१३ मीटर पाणीपातळी झाली असून, ६६.१९७ द.ल.घ.मी म्हणजे धरण ६७ टक्के भरले आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाला आहे. सध्या तुळशी जलाशय ६७ टक्के भरले आहे. दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. जलाशयात २.३३ टीएमसी साठा झाला असून, १९९३ मिमी. पाऊस झाला आहे. गतवर्षी २५१३ मिमी. पावसाची नोंद झाली होती. जलाशयाशेजारी असणाऱ्या लोंढा नाला प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प
पिंपळगाव ः गारगोटी-किल्ले भुदरगड मार्गावर अरण्य क्षेत्राजवळील झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक बंद राहिली. मुरुक्‍टे फाटा दरम्यान अस्ट्रोलियन बाभूळ जातीचे मोठे झाड रस्त्यावर पडले होते. दुपारनंतर झाड बाजूला केल्यावर वाहतूक सुरळीत झाली.

भोगावती बाजारपेठेत पाणी
शाहूनगर ः भोगावती परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भोगावती नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पावसाने ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले असून, भोगावती पात्राबाहेर पडली आहे. कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावर अनेक ठिकाणच्या पुलांवर पाणी आल्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. मुसळधार पावसाने भोगावती बाजार पेठेतील काही दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. पावसाने बाजार पेठेत शुकशुकाट जाणवत आहे. भात व उसाच्या पिकामध्ये पावसाचे पाणी शिरले असून, नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत.

आजऱ्यात पावसाची संततधार
आजरा ः तालुक्‍यात आजअखेर सरासरी ११८८ मिमी पाऊस झाला. भात रोप लावणीची कामे नव्वद टक्के झाली आहेत. जोरदार पावसाच्या माऱ्याने घरांची पडझड सुरुच आहे. हरातील गांधीनगर येथील गीता प्रकाश नेवरेकर यांच्या घरांची भिंत पडून पंधरा हजारांचे नुकसान झाले. हिरण्यकेशी व चित्रा नदी दुथडी भरून वाहत आहेत. ओढ्या नाल्यांना पाणी आले आहे. तालुक्‍यात वर्षा पर्यटन जोरात असून, पर्यटकांची पावले चित्री, आंबोली, रामतीर्थ परिसरात होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com