कृष्णा नदीच्या पात्राला जलपर्णीचा विळखा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

कऱ्हाड - येथील कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा विळखा वाढत असून टेंभूसाठी सुमारे तीन महिन्यांपासून अडवलेल्या कृष्णा नदीपात्रात जलपर्णी वाढू लागली आहे. पालिकेकडून त्यावर तातडीने कार्यवाही होण्याची अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्‍त होत आहे. 

कऱ्हाड - येथील कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा विळखा वाढत असून टेंभूसाठी सुमारे तीन महिन्यांपासून अडवलेल्या कृष्णा नदीपात्रात जलपर्णी वाढू लागली आहे. पालिकेकडून त्यावर तातडीने कार्यवाही होण्याची अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्‍त होत आहे. 

टेंभू योजनेसाठी सप्टेंबरमध्ये गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्णा नदीचे पाणी अडवण्यात आले. तेव्हापासून दुष्काळी भागाला कृष्णेचे पाणी उचलून देण्यात येत आहे. दरम्यान, टेंभूमुळे होणाऱ्या पाण्याच्या फुगीमध्ये मिसळणारी गटारे, नाले, ओढे यामुळे नदीपात्रातील पाणी प्रदूषित होत आहे. कऱ्हाड व मलकापूर पालिकांचा जलशुध्दीकरण प्रकल्प असला तरी नदीकाठच्या गावांत थेट नदीपात्रातून उचललेल्या पाण्यात टीसीएल पावडर टाकून पाणी शुध्द केले जाते. त्यामुळे त्यातून पाणी कितपत शुध्द होते, याबाबत साशंकता आहे. सुमारे तीन महिन्यांपासून कृष्णेच्या अडवलेल्या पाण्यात शहराच्या हद्दीत जलपर्णीचा विळखा वाढू लागला आहे. 

काही ठिकाणी नदीपात्रातील पाण्यामध्ये गवतही उगवत असल्याचे दिसून येते. पालिकेने यापूर्वीही स्मशानभूमी मागील बाजू व कोयना नदीपात्रात, संत तुकाराम हायस्कूलच्या मागील बाजूस नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचा तातडीने निर्णय घेतला होता. नदीपात्रात वाढणाऱ्या जलपर्णी व बगळ्यांमुळे पाण्याच्या शुद्धतेबाबत शंका उपस्थित होत असल्याने पालिकेने त्याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. शहरात स्वच्छ सर्वेक्षणमुळे सुरू असलेल्या स्वच्छतेसोबतच पालिकेने नदीपात्रातील जलपर्णी काढण्याची कार्यवाही करण्याची गरज आहे. त्यावर पालिका पदाधिकारी, अधिकारी काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून आहे.

युवकांचे सहकार्य...
पालिकेने यापूर्वी निविदा काढून स्थानिक युवकांच्या सहकार्याने जलपर्णी हटवण्याची मोहीम राबवली होती. त्यासाठी पालिकेत खर्चालाही मंजुरीही देण्यात आली होती. त्यानुसार सध्या स्थानिक युवकांच्या सहकार्याने फोफावत असलेली जलपर्णी हटवण्यासाठी गतीने कार्यवाही होण्याची गरज आहे.

Web Title: Krishna River Jalparni