कृष्णा नदीचे प्रदुषण नेमके कशामुळे ?

Krishna River Pollution Due To Sheri Nala
Krishna River Pollution Due To Sheri Nala

सांगली - गेले आठवडाभर कृष्णा नदीत शेरीनाला मिसळत असूनही त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याबद्दल प्रदूषण महामंडळाने नोटीस बजावली आहे. सांडपाणी तत्काळ रोखण्यासंदर्भात उपाययोजना करण्याची सूचना केली आहे. तर कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयास अहवाल पाठवला असून महापालिकेवर कठोर कारवाईची शिफारस केली आहे. 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शेरीनाल्याचे सांडपाणी कृष्णा नदीत मिसळत असलेल्या ठिकाणी जाऊन दूषित पाण्याचे नमुने घेतले. आठवडाभर हा प्रकार सुरू असतानाही दुर्लक्ष केल्याबद्दल महापालिकेला नदी प्रदूषणाबाबत नोटीस बजावली आहे. नदीत सांडपाणी मिसळत असल्याबद्दल चार वर्षांपासून वार्षिक सव्वा कोटींचा महापालिकेला दंड होत आहे. तरीही यावर उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दलही नोटिशीत ताशेरे ओढले आहेत. 

योजना अपूर्णच

अनेक वर्षे कृष्णा नदीत शेरीनाल्यातून सांडपाणी मिसळत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. प्रत्येक निवडणुकीत शेरीनाल्याचा प्रश्‍न प्रचाराचा मुद्दा होतो. महापालिकेने नदी शुद्धिकरण योजनेंतर्गत शेरीनाला योजना राबवली. पण, 40 कोटी रुपये खर्च करुनही योजना अपूर्णच आहे.  आठवडाभरापासून शेरीनाल्यासह विविध प्रकारचे सांडपाणी नदीकाठाने सरकारी घाटाजवळ बांध फुटून नदीत मिसळत आहे. त्यावर नागरिकांनी अनेक तक्रारीही केल्या आहेत. मात्र त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ औताडे यांच्या पथकाने आज सरकारी घाटावर जेथे सांडपाणी नदीत मिसळते तेथे जाऊन त्याचे नमुने घेतले आणि ते पाणी जिल्हा प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले. त्याचा तातडीने अहवाल घेतला. तसेच महापालिकेला नदीत सांडपाणी सोडून प्रदूषण करीत असल्याबद्दल नोटीस बजावली. त्याचबरोबर पुढील कारवाईसाठी कोल्हापूरच्या प्रादेशिक कार्यालयाकडेही अहवाल पाठविला असून महापालिकेवर कठोर कारवाईची शिफारस केली आहे. 

सांडपाणी नदीत सोडल्याने नोटीस
महापालिकेने सांडपाणी व्यवस्थापन न केल्याने दररोज लाखो लिटर सांडपाणी कृष्णा नदीत मिसळते. यामुळे प्रदूषणाचा धोका वाढला आहे. तसेच नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. याबद्दल वार्षिक सव्वा कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यासंदर्भात हरित न्यायालयात याचिका सुरू आहे. सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल पुन्हा नोटीस बजावली आहे. 
- नवनाथ औताडे, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण महामंडळ  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com