कृष्णेत पोहण्यावर संक्रात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

पाण्याला दुर्गंधी; मगरीचीही भीती, ऐन उन्हाळ्यात स्थिती  

सांगली - उन्हाळ्याच्या सुटीची चाहूल लागताच येथील कृष्णा नदी पात्रात पोहण्यास गर्दी वाढू लागली आहे. मात्र कृष्णेच्या पाण्याला दुर्गंधी सुटल्याने पोहणाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. मगरीच्या वावराची त्यात भर पडली आहे. वाढत्या गर्दीच्या काळात सुरक्षेचा भाग म्हणून येथे पट्टीच्या पोहणाऱ्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. असह्य उकाड्याने हैराण झालेल्यांनी पोहण्यास नदीकडे धाव घेतली आहे. माईघाटावर दुपारीही पोहणाऱ्यांची गर्दी दिसत आहे. मात्र दोन वर्षे अधूनमधून माईघाट नदीपात्रात मगरीचे अनेकदा दर्शन झाले आहे. त्याचीही भीतीची छाया आहे.

वनविभागाने मगरीला पकडण्यास बायपास पुलालगत पिंजरे लावले. मात्र मगर सापडलीच नाही. मगर पकडावी किंवा नाही यावरचा प्रशासकीय खल सुरू आहे. एकीकडे मगरीची भीती तर कृष्णेच्या पाण्याची अक्षरशः गटारगंगा झाली आहे. पाण्याला दुर्गंधी येत असल्याने सकाळी नियमित पोहणाऱ्यांच्या संख्येतही घट झाली आहे. महाबळेश्‍वरपासून कृष्णा नदीत सर्रास गटारीचे पाणी मिसळत असते. अधूनमधून सांगलीचा प्रसिद्ध शेरीनालाही मिसळतो. त्यामुळे एकूण नदीची अवस्था गटारीप्रमाणेच झाली आहे. पाणी प्रदूषणाबाबत नागरिक, ओघानेच प्रशासनही गंभीर नाही.  

दोन दिवसांपूर्वी रोटरीच्या जलतरण तलावात बुडून एकाचा मृत्यू झाला. त्यापासून धडा घेऊन किमान माई घाट परिसरात तरी पट्टीच्या पोहणाऱ्यांची जीवरक्षकांची महापालिकेने स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने रक्षक म्हणून नियुक्ती करावी, अशी अपेक्षा आहे. कृष्णामाई जलतरण केंद्रातर्फे २५ ते ३० वर्षे पोहण्याची शिबिरे घेतली जातात. मगरीच्या दर्शनाने या शिबिरांवरही परिणाम झाला आहे. गेल्यावर्षी शिबिर झाले नाही. यंदाही अजून निर्णय झालेला नाही, असे संयोजक भास्कर कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: krishna river swimming