कृष्णा स्वच्छतेला मिळणार गती

कृष्णा स्वच्छतेला मिळणार गती

सातारा - कृष्णा नदी स्वच्छता मोहिमेला आलेली मरगळ झटकण्यासाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे हे सर्व कामांचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे कृष्णा नदी स्वच्छता मोहिमेला पुन्हा एकदा गती मिळण्याची शक्‍यता आहे.

कृष्णा नदी स्वच्छतेसाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेऊन नदीकाठच्या गावांत जागृती करून स्वच्छतेची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत सामाजिक, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुरवातीला वाई येथे महागणपती परिसरातील कृष्णा घाटांची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये वाई पालिकेसह आमदार मकरंद पाटील यांनी पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम राबविली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी हटविण्यात आली. यानंतर नदीकाठच्या गावांनीही मोहीम पुढे राबवत आपापल्या परिसरात नदीची स्वच्छता केली. तसेच सातारा, कऱ्हाड येथे ही नदीपात्रातील जलपर्णी हटविली. एकूणच कृष्णा नदी स्वच्छतेला लोकचळवळीचे रूप प्राप्त झाले. आता पावसाळा संपल्यामुळे पुन्हा एकदा नदीपात्राची स्वच्छता करणे गरजेचे आहे. अन्यथा आगामी काही महिन्यात पुन्हा नदीपात्रात जलपर्णी वाढण्याची शक्‍यता आहे.

जलपर्णी वाढण्यास कारणीभूत असलेले सांडपाणी गावागावांतून नदीपात्रात मिसळत आहे. हे सांडपाणी गावाच्या ठिकाणीच मुरविण्यासाठी शोषखड्डे काढण्याची मोहीम नदीकाठच्या गावांत जिल्हा परिषदेने राबविली. आता नगरपालिका क्षेत्र असलेल्या सातारा, कऱ्हाड आणि वाई शहरांतील सांडपाणी कृष्णा नदीपात्रात मिसळू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण, नदीकाठच्या गावांना या नदीतूनच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी दूषित होऊ नये म्हणून गावातील सांडपाणी शोषखड्डयांतच मुरविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. या सर्व कामांचा आढावा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घेणार आहेत. तसेच पुढील काळात कोणत्या उपाययोजना करता येतील, हेही निश्‍चित केले जाणार आहे. त्यामुळे कृष्णा नदी स्वच्छतेला गती मिळण्याची शक्‍यता आहे.

उदयनराजेंनी पुढाकार घेण्याची गरज
कृष्णा नदीकाठच्या मोठ्या नगरपालिकांचे सांडपाणी नदीपात्रात मिसळण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. त्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासाठी वाई, सातारा आणि कऱ्हाड पालिकेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी पुढाकार घेतल्यास हे काम तातडीने मार्गी लागू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com