कृष्णा खोरेची किल्ली पुन्हा ‘दिल्ली’

कृष्णा खोरे विकास महामंडळाची विविध कामे.
कृष्णा खोरे विकास महामंडळाची विविध कामे.

भाजपला चार आमदार आणि एक खासदार पक्षाला देऊनसुद्धा सांगलीच्या पदरात काहीच नव्हते. सारी  पदांची लयलूट कोल्हापूरलाच जात होती; पण मुख्यमंत्र्यांनी आपल्या सत्तेच्या अखेरच्या पर्वात का असेना सांगलीच्या पदरात एक मोठे महामंडळ टाकले आहे. ‘कृष्णा खोरे’चे उपाध्यक्षपद खासदार संजय  पाटील यांना देऊन ते भविष्यातही भाजपमध्येच असतील, याची काळजी घेतली आहे. सोबत लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा तेच उमेदवार असतील, असा स्पष्ट संकेत दिला गेला. आमच्याकडे एकच नाही तर आणखी ‘पाटील’ नावाचे नेते आहेत, हा सुद्धा संदेश द्यायचा असावा.

पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपकडे प्रभावी नेता नाही. चंद्रकांतदादा आहेत; पण त्यांचे कोल्हापूर जिल्हा लिमिटेड धोरण आहे. पुणे सोडता या विभागातील सर्व जिल्हे शेती, पाणी याच महत्त्वपूर्ण विषयाचे आहेत. त्या दृष्टिकोनातून भाजपकडे नेतृत्व नाही. खासदार राजू शेट्टींनी ‘एनडीए’शी घटस्फोट घेतल्याने दुसरा शेतीशी निगडित नेता भाजपला उभा करायलाच हवा.

सदाभाऊंच्या काही मर्यादा या काळात स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे नव्या दृष्टिकोनातून कृष्णा खोरेचा चेंडू अगदी अखेरची षटके बाकी राहिली असताना संजयकाकांच्या हाती दिला आहे. आता ते कप्तान देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित ते यश मिळवून देतील, की  नाही आणि भाजपला सावरतील काय हे येणारा वर्षभराचा कालावधीच सांगेल. तूर्तास संजयकाकांबद्दल पुन्हा ते स्वगृही परततील, अशा ज्या काही चर्चा चालू होत्या,  त्या सर्वांना विराम मिळाला आहे, तो पूर्णविरामच ठरू शकेल. कदाचित नाना पटोले प्रकरणापासून भाजपने काही धडा घेतला असेल तर तो हाच आहे की, अन्य पक्षांतून भाजपमध्ये जे आले त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. काँग्रेस व राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले नाराज आहेत, अशा प्रकारची चर्चा पक्षाला मारक ठरू लागली होती. विदर्भात याचा फटका बसू लागला होता. काकांच्या निवडीनंतर बाहेरून आलेल्यांचा सन्मान होईल, असाही संदेश भाजपने दिला आहे.

जे संजयकाका विधानसभेला सातत्याने काठावर नापास होत होते, ते एकदम अडीच लाखाने खासदार झाले. खरे तर हा चमत्कार होता आणि काँग्रेसच्या नाकरर्तेपणाविरुद्धची जनतेची प्रतिक्रियाही होती; पण भाजपच्या सत्तेची चार वर्षे झाली तरी ‘अच्छे दिन’ ना जनतेला ना त्यांच्या नेत्यांना अशी अवस्था झाली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या काळात तीन ते चार  कॅबिनेट मंत्रिपदे मिरवणाऱ्या या जिल्ह्यात एकही मंत्रिपद नाही, (अपवाद सदाभाऊंचा) अशी स्थिती स्थानिक  भाजप नेत्यांना अस्वस्थ करत होतीच. पण विरोधकही भाजपमध्ये एकही पात्र नेता नाही अशी टीका करीत होते. फडणवीस विदर्भवादी असल्याने त्यांचा सांगलीवर राग आहे, असेही बोलले जायचे. पण आता हा अनुशेष काही प्रमाणात फडणवीसांनी भरून काढला आहे, असे म्हणायला हरकत नाही. 

‘कृष्णा खोरे’ वर स्थापनेनंतर साताऱ्याचे वर्चस्व राहिले. मुळात या महामंडळाची संकल्पनाच सांगलीच्या नेत्यांनी युतीला पाठिंबा देण्याच्या अटीवर मांडली. सुरवातीला अजितराव घोरपडे ‘कृष्णा खोरे’ चे राज्यमंत्री होते. पण त्यानंतर आता बरेच पाणी वाहून गेले. खाबूगिरी आणि रखडलेल्या योजनांमुळे खूप टीका झाली. गेल्या २२ वर्षांत साताऱ्यातील काही तालुके आणि सांगलीतील आटपाडी, कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्‍यांतील काही गावे आणि मंगळवेढ्यापर्यंत पाणी पोहोचवले आहे.

पुण्याच्या काही भागासह सोलापूर, माढा, हातकणंगले, सांगली आणि सातारा अशा  लोकसभा मतदार संघापर्यंत या महामंडळांची व्याप्ती  आहे. त्यामुळे या निमित्ताने संजयकाकांच्या नेतृत्वाचा परीघसुद्धा वाढणार आहे. मुख्य म्हणजे परंपरा मोडून पहिल्यांदाच खासदाराकडे याचे नेतृत्व सोपविले आहे.

राज्याकडे यासाठी निधी पुरेसा नसतो. पण केंद्रात आता सिंचन नितीन गडकरींकडे आहे आणि संजयकाका खासदार आहेत त्यामुळे ते मोठा निधी आणू शकतील. उर्वरित योजना पूर्णत्वाकडे जाईल, या आशा पल्लवित झाल्यात. मुख्य म्हणजे टंचाईचा मोठा शाप असलेल्या जतमध्येच ही योजना पूर्णत्वाला गेलेली नाही. त्याला आता गती मिळण्याची आशा आहे.
उसापाठोपाठ द्राक्ष, बेदाण्याची उलाढालही जिल्ह्यात मोठी आहे. जेथे घागरभर पाणी मिळणे मुश्‍कील होते, तेथे पाण्याचे पाट वाहू लागलेत.

ड्रायपोर्ट व चार महामार्गांसारख्या योजनाही संजयकांकांनी आणल्यात. हे सगळं राजकारण बाजूला ठेवून केले तर हा जिल्हा भविष्यात मोठा वेग पकडू शकेल. सगळ्यात महत्त्वाचे काकांचे तळ्यात-मळ्यात थांबेल. शिवाय तासगाववरच मन रमू लागले होते ते सारेच आता थांबेल!

आता मॅच ट्‌वेंटी-ट्‌वेंटी
सिंचन योजनेच आधुनिकीकरण करण्याचेही नियोजन आहे. यामध्ये बंद पाईपलाईनमधून पाणी, सौर ऊर्जेवर पंप हाऊस या सर्व गोष्टींना सुरुवात करण्याची संधी काकांना मिळाली. पाच हजार कोटींचा नवा आराखडा  मंजूर आहे. तीन हजार कोटींनी तो वाढला. त्यामुळे शेतीच्या पायाभूत विकासाची मोठी संधी त्यांच्या हाती आली. अर्थात आता मॅच ट्‌वेंटी-ट्‌वेंटी आहे. ते किती गतीने या संधीचा वापर करतात त्यावरच पक्षाला आणि त्यांच्या स्वत:च्या प्रतिमेलाही याचा राजकीय फायदा मिळू शकतो.

जयंतरावांचा चिमटा...
आघाडीच्या काळात ‘म्हैसाळ’चे पाणी बिल टंचाईतून भरले जात होते. भाजपच्या काळात ते झाले नाही.  यासाठी काकांना ‘पक्ष सोडतो’, अशी धमकी द्यावी लागली. त्यानंतर पाणी सुरू झाले. आता काका ड्रायव्हिंग सीटवर आलेत. त्यामुळे वीज बिलाची व पाण्याची चिंता मिटली, अशा शब्दांत या निवडीवर भाष्य करून जयंतरावांनी काकांना चिमटा काढला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com