मिरज : कृष्णाघाट रेल्वेगेट दोन दिवस राहणार बंद 

मिरज : कृष्णाघाट रेल्वेगेट दोन दिवस राहणार बंद 

मिरज - मिरज ते कृष्णाघाट रस्त्यावरचे रेल्वेगेट लोहमार्ग दुरुस्तीच्या कारणास्तव दोन दिवस बंद ठेवले जाणार आहे. यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होणार आहे. रेल्वे उड्डाण पुलाची गरज पुन्हा चर्चेत आली. 

मिरजेतून कृष्णाघाटसह शिरोळ, कुरुंदवाड व नृसिंहवाडीला दररोज हजारो वाहने या गेटमधून जातात. मिरजेतील नागरिकांना कृष्णाघाट स्मशानभूमीत जाण्यासाठीही हा एकमेव मार्ग आहे. या रस्त्याला मिरज -बेळगाव आणि मिरज-पंढरपूर लोहमार्ग छेदतात. रेल्वेगेट शनिवारी (ता. 18) सायंकाळी सहा वाजता बंद होईल. दुरुस्तीनंतर सोमवारी (ता. 20) संध्याकाळी सहा वाजता खुले होईल. 

गेटवरील लोहमार्गाची वेळोवेळी दुरुस्ती गरजेची असते. वाहनांच्या वर्दळीने झीज होत असते; त्यांची दुरुस्ती या दोन दिवसांत करणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. चारच महिन्यांपूर्वी दुरुस्तीसाठी दोन दिवस बंद ठेवले होते; आता पुन्हा बंद राहणार असल्याने प्रवासी हैराण आहेत. 

पर्यायी मार्ग 
कृष्णाघाटावर नेले जाणारे मृतदेह पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत न्यावे लागतील. रहिवाशांना मिरजेत येण्यासाठी कोल्हापूर रेल्वे चाळीतील चिंचोळ्या मार्गाचा वापर करावा लागेल. छोटी चारचाकी वाहनेही जाऊ शकतील. शहरी बस व मोठ्या वाहनांना मात्र जयसिंगपूरमार्गे यावे लागेल. सुटीत नृसिंहवाडीला देवदर्शनासाठी राज्यभरातून भाविक येतात. त्यांनाही जयसिंगपूरमार्गे फेरी मारावी लागेल. 

उड्डाणपुलाची मागणी 

दिवसात शंभरावर रेल्वे जाणाऱ्या गेटच्या ठिकाणी उड्डाण पुलाची मागणी 25 वर्षांपासून होत आहे. चोवीस पैकी सहा ते सात तास रेल्वेसाठी गेट बंद असते. कृष्णाघाटावर जाणाऱ्या शववाहिकादेखील खोळंबतात. रुग्णवाहिकेत अत्यवस्थ अडकतात. तरीही पुलाची मागणी मार्गी लागलेली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com