सांगलीत कृष्णेचे पाणी उपनगरात शिरले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

सांगलीत गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीची पाणी पातळी वाढत आहे. मंगळवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वेगाने वाढली. गेल्या 24 तासात सुमारे 20 फूट पातळी वाढल्याने पाणी कर्नाळा रोडवर आले.

सांगली : सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून आज सकाळी आयर्विन पुलाजवळ 35 फूट पातळी होती. नदीचे पाणी कर्नाल रोड वरील उपनगरात घुसले आहे. तेथील शंभरहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

शहरात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीची पाणी पातळी वाढत आहे. मंगळवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वेगाने वाढली. गेल्या 24 तासात सुमारे 20 फूट पातळी वाढल्याने पाणी कर्नाळा रोडवर आले.

काल (ता. 30) रात्री दहाच्या सुमारास पाणी सुर्यवंशी प्लॉट सह आजूबाजूच्या परिसरात घुसले. तेथे पाणी वाढल्यामुळे महापालिकेने तातडीने हालचाल करून रात्रीच नागरिकांचे स्थलांतर करण्यास प्रारंभ केला. सकाळ पर्यंत सुमारे शंभरावर नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. त्यांची महापालिकेच्या शाळा नंबर 1 व 25 मध्ये सोय करण्यात आली आहे.

कृष्णा नदीची पाणी पातळी वाढल्याने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्नाळ रोड, दत्तनगर, सूर्यवंशी प्लॉट आदी भागात पुराचे पाणी शिरले आहे. नदीकाठी असणाऱ्या दत्तनगर भागातील नागरीकांना सर्तकच्या सुचना देण्यात आल्या असून मध्यरात्री पासून सांगली महापालिका यंत्रणा आणि अग्निशमन विभाग, आपत्ती नियंत्रण कक्ष पूर भागात मदतकार्यात सक्रिय आहे. 

ज्या भागात पाणी येत आहे तेथील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हालवण्याचे आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थिती नागरिकांना महापालिकेच्या शाळांमध्ये निवारा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पाणी पातळी वाढत असल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे यासाठी महापालिका यंत्रणा मदत करेल असे आवाहनही आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Krushna river water enters in Sangali out skirts area