धरणातून पाणी सोडल्याने क्षितिजाचा मृत्यू : ग्रामस्थांचा आराेप

राजेश पाटील
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

चार दिवसांपासून प्रशासन क्षितिजाचा नदीपात्रात शोध सुरू होता. त्यासाठी ग्रामस्थांसह काही पट्टीच्या पाेहणाऱयांनी देखील मदत केली हाेती.
 

ढेबेवाडी (जिल्हा सातारा) ः नातेवाईकांच्या गावातून घरी परतताना मोरेवाडी (ता. पाटण) येथून वांगनदीतून वाहून गेलेल्या सणबुर (ता. पाटण) येथील शाळकरी मुलीचा मृतदेह आज (रविवारी) सकाळी ढेबेवाडीजवळच्या पुलानजीक नदीपात्रात सापडला.

सणबुर येथील शंकर रामचंद्र साठे (वय 73) हे गुरुवारी सकाळी आपल्या तीन चिमुकल्या नाती सोबत वांगनदीचे पात्र ओलांडत असताना चौघेही पाण्याच्या लोटाबरोबर वाहून गेले होते. त्यातील तिघांना स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून वाचवले हाेते.


 
क्षितिजा शिवाजी साठे (वय 12) हिला वाचविण्यात त्यांना यश आले नव्हते. चार दिवसांपासून प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस,ग्रामस्थ आणि मासेमारी करणाऱ्यांच्या मदतीने क्षितिजाचा नदीपात्रात शोध सुरू होता.

आज (रविवारी) सकाळी ढेबेवाडीजवळच्या पुलानजीक नदीपात्रात क्षितिजा हिचा मृतदेह सापडला. दरम्यान मराठवाडी धरणातून पूर्वसूचना न देता नदीपात्रात पाणी सोडल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप सणबुर ग्रामस्थांनी केला आहे. जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेण्यात आला आहे. परिणामी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामस्थांनी आजाेबांसह नातींना वाचविले...पण 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kshitija's Death Due To Release Of Water From The Dam Says Villagers