कुकडी कालवा पुन्हा झाला वाहता ः "ई-सकाळ'च्या बातमीचा परिणाम

संजय आ. काटे
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

श्रीगोंदे (नगर) ः श्रीगोंद्याच्या वाट्याचे पाणी न देताच "कुकडी'चे आवर्तन काल (गुरुवारी) सायंकाळी बंद झाले. "ई-सकाळ'ने याबाबतचे वृत्त सकाळी प्रकाशित केले होते. यानंतर आमदार राहुल जगताप यांनी पाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडविण्याचा इशारा दिला होता. सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली. यानंतर सूत्रे हलली. दुपारनंतर "कुकडी'चे पाणी पुन्हा सोडण्यात आले.

श्रीगोंद्यातील 75 टक्के सिंचन राहिले असतानाच, "कुकडी'चे कार्यालय पारनेर व नगरला आणण्याच्या मूळ वादातून पुण्यातील काही नेत्यांनी येडगाव कालवा बंद केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (शनिवारी) तालुका दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी वाढली.

"कुकडी'तून 29 जुलैला शेतीचे आवर्तन सुरू झाले. मात्र, अजूनही पाणी कर्जत व करमाळा भागातच सुरू आहे. गेल्या काही दिवसांत श्रीगोंदे तालुक्‍यातील वितरिका सुरू झाल्या; मात्र किरकोळ स्वरूपात भरणे झाले आणि काल पाणी बंद झाले. करमाळा व कर्जतच्या नेत्यांचे पाण्यावरून वाद झाले. पाऊस नाही आणि आता "कुकडी'चे पाणीही नाही, अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्याला उभे वारे सुटले आहे.

मध्यंतरी पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी बैठक घेऊन पाण्याचे नियोजन केले. त्यात श्रीगोंदे तालुक्‍यात दोन सप्टेंबरला पाणी देण्याचे ठरले. प्रत्यक्षात मात्र ही वेळ तर पाळली गेली नाहीच; शिवाय आता सिंचन सुरू झाले आणि पाणी बंद झाल्याने सगळाच गोंधळ झाला. गेल्या दीड महिन्यापासून पाणी कर्जतच्या काही भागातच सुरू आहे. त्यामुळे श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांचा संयम संपला आहे.

पाणी बंद झाल्याची माहिती श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना "ई-सकाळ'च्या वृत्तामुळे समजली. त्यानंतर आमदार जगताप यांनी, मुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा अडविण्याचा इशारा दिला. ऑनलाइन बातमीची दखल घेत अखेर जलसंपदा विभागाने आज दुपारी पुन्हा पाणी सोडले. त्यामुळे श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांनी "सकाळ'चे आभार मानले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kukadi canal flows again: the result of e-sakal news