कुलभूषण जाधव यांचे आनेवाडीशी ऋणानुबंध 

प्रशांत गुजर
मंगळवार, 11 एप्रिल 2017

सायगाव - आनेवाडी (ता. जावळी) येथे अधूनमधून वास्तव्यास असणारे व मुंबईत राहणारे नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण सुधीर जाधव यांना पाकिस्तान सरकारने हेरगिरी केल्याचा आरोप करून फाशीची शिक्षा सुनावली असल्याचे समजताच आनेवाडी येथील गावकरी सुन्न झाले. आनेवाडी येथील वास्तव्यात जाधव सामाजिक कार्यात हिरिरीने सहभागी होत असल्याने ते परिसरात परिचित होते. 

सायगाव - आनेवाडी (ता. जावळी) येथे अधूनमधून वास्तव्यास असणारे व मुंबईत राहणारे नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण सुधीर जाधव यांना पाकिस्तान सरकारने हेरगिरी केल्याचा आरोप करून फाशीची शिक्षा सुनावली असल्याचे समजताच आनेवाडी येथील गावकरी सुन्न झाले. आनेवाडी येथील वास्तव्यात जाधव सामाजिक कार्यात हिरिरीने सहभागी होत असल्याने ते परिसरात परिचित होते. 

जाधव यांचे मूळ गाव भुईंज (ता. वाई) आहे, अशी गावकऱ्यांत चर्चा होती. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून जाधव यांचे वास्तव्य असे. त्यांनी पुणे- बंगळूर महामार्गावरील आनेवाडी येथील पाटबंधारे वसाहतीशेजारी शेती खरेदी करून फार्म हाऊस बांधले होते. निवृत्त पोलिस असणारे वडील व आई यांच्यासह ते वर्षातून तीन-चार वेळा सुटीसाठी येत असत. आल्यानंतर मात्र जाधव स्वस्थ न बसता सामाजिक कामात रमत असत. त्यामुळे ते आपल्या सामाजिक कामाने अल्पावधीत परिचित झाले होते. येथील शाळांत जाऊन विद्यार्थांना शैक्षणिक वस्तू पुरविणे, त्यांना गरजेनुसार मदत करणे हा त्यांचा छंद होता. "देशसेवा हीच खरी ईश्‍वर सेवा' अशी निष्ठा ठेवून देशाप्रती असणारा आदर आणखी दृढ करण्यासारख्या सेनेतील गोष्टी ते सांगत. मुलांना देशाविषयी आदरयुक्त प्रेम निर्माण व्हावे, अशी इच्छा असणारे जाधव यांना शेतीचीही मोठी आवड होती. माझ्या देशातील प्रत्येक मुलाने देशसेवा करावी, अशी भावना बाळगणारे जाधव प्रत्येक कामात हिरिरीने भाग घेणारे म्हणून परिचित होते. 

कुलभूषण जाधव यांना गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तान सरकारने पकडले होते. आज त्यांना पाकिस्तान सरकारने फाशीची शिक्षा सुनावली. यामुळे पाकिस्तानी सरकार खोटे आरोप करून त्यांना या प्रकरणात अडकवू पाहात आहे, अशी परिसरात चर्चा होती. धुळे येथील जवान चंदू चव्हाण यांना सोडवून आणले, तसेच भारत सरकारने जोरदार ताकद लावून कुलभूषण जाधव यांच्यासाठीही प्रयत्न केले पाहिजेत, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे. 

कुलभूषण जाधव गेल्या सहा वर्षांपासून आनेवाडीत वास्तव्यास आहेत. हेरगिरीसारख्या गोष्टी त्यांच्याकडून नक्कीच होणार नाही. त्यांना भारत सरकारने सोडवून त्यांच्यावर अन्याय होऊ देऊ नये.'' 
- सदाशिव टिळेकर (आनेवाडी, माजी सभापती, जावळी तालुका) 

Web Title: kulbhushan jadhav aanewadi