कुपवाडचे नगरसेवक धनपाल खोत पुन्हा राष्ट्रवादीत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

काही महिन्यापुर्वीच भाजपला सोडचिट्ठी दिलेले कुपवाडचे नगरसेवक धनपाल खोत यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. इस्लामपूर येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी महापौर सुरेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शहर जिल्हाध्यक्ष कमलाकर पाटील उपस्थित होते.

सांगली - काही महिन्यापुर्वीच भाजपला सोडचिट्ठी दिलेले कुपवाडचे नगरसेवक धनपाल खोत यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. इस्लामपूर येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी महापौर सुरेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शहर जिल्हाध्यक्ष कमलाकर पाटील उपस्थित होते. 

कुपवाडच्या राजकारणात ग्रामपंचायतीपासून सक्रीय असलेले धनपाल तात्या यांचा कॉंग्रेस,राष्ट्रवादी, भाजप आणि पुन्हा राष्ट्रवादी असा प्रवास आज पुर्ण झाला. 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर काही महिन्यापुर्वीच त्यांनी भाजपलाही दिली. त्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार याबद्दल कुतूहल होते. 1978 मध्ये ते कुपवाड ग्रामपंचायतीत सदस्य झाले. त्यानंतर कुपवाड नगरपालिकेत एकदा आणि महापालिकेत चार वेळा नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत. स्थायी समितीचे सभापतीही ते होते. त्यांच्या पत्नी सुलोचना यांचाही तसाच राजकीय प्रवास असून त्या देखील तीनवेळा महापालिकेत नगरसेवक म्हणून विजयी झाल्या आहेत. मिरज विधानसभा मतदारसंघातून त्यांची कॉंग्रेसमधून निश्‍चित झालेली उमेदवारी ऐनवेळी रद्द झाली होती. त्यावेळी कै.हाफिज धत्तुरे यांना कॉंग्रेसने मुस्लीम ओबीसी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून संधी दिली आणि खोत यांची आमदारपदाची संधी हुकली. आता ते पुन्हा एकदा महापालिका सभागृहात सहकुंटुंब जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

पक्षात मी कुपवाड शहराच्या विकासाचा अजेंडा घेऊन प्रवेश केला आहे. महाआघाडीचा मी देखील एक भाग होतो. त्यावेळी नेते जयंतरावांनी पालिकेला दिलेला विकास निधी त्यानंतर कुणालाही तसा देता आला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मी राज्यस्तरावर काम करण्यासाठी इच्छुक आहे. असे धनपाल खोत यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Kupwad corporator Dhanpal Khot again in NCP