संत साहित्याचे गाढे अभ्यासक ल. रा. नसिराबादकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

कोल्हापूर - संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. लक्ष्मण रामदास नसिराबादकर (वय ८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले होते. त्यांनी ४० वर्षे मराठीचे अध्यापन आणि संशोधन केले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. 

कोल्हापूर - संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. लक्ष्मण रामदास नसिराबादकर (वय ८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले होते. त्यांनी ४० वर्षे मराठीचे अध्यापन आणि संशोधन केले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. 

डॉ. नसिराबादकर मूळचे जळगाव जिल्ह्यातील नसिराबाद (ता. जळगाव) येथील होते. रयत शिक्षण संस्थेच्या कराड, सातारा, पंढरपूर, श्रीरामपूर येथील महाविद्यालयात त्यांनी मराठी भाषा विषयाचे अध्यापन केले. त्यानंतर ते शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

विद्यापीठातील संत तुकाराम अध्यासनाच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. या अध्यासनाचे ते पहिले प्रमुखही होते. ते पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक होते. त्यांनी ‘मराठी वाङ्‌मयाचा इतिहास’, ‘अत्रे साहित्य दर्शन’, ‘महाद्वाराच्या पायरीशी’, ‘प्रबोधनाच्या पाऊलवाटा’, ‘व्यावहारिक मराठी’ आदी पुस्तकांचे लेखन केले. निवृत्तीनंतरही ते साहित्य चळवळीत सक्रिय होते. ते समाजहितैषी प्राध्यापक होतेच, शिवाय नामवंत समीक्षक होते. त्यांनी सातत्याने नियतकालिकांतून लेखन केले. मराठी साहित्य समीक्षेतील त्याची कामगिरी अलौकिक होती.

महाराष्ट्रातील अनेक व्यासपीठे त्यांनी आपल्या विद्वतप्रचुर व्याख्यानांनी समृद्ध केली. प्रख्यात मराठी समीक्षक (कै.) गं. बा. सरदार यांच्या साहित्यावरील (१९८० मध्ये प्रकाशित) त्यांची समीक्षा महाराष्ट्रात नावाजली गेली. डॉ. निर्मलकुमार फडकुले साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या गं. ना. जोगळेकर पुरस्कारासह अन्य प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला होता. करवीरनगर वाचन मंदिराचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद, वाङ्‌मय चर्चा मंडळ या संस्थांच्या माध्यमातून ते साहित्य चळवळीत सक्रिय होते. महालक्ष्मी सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते. ते विद्यमान संचालकही होते. त्यांच्या जाण्याने संत साहित्याचा गाढा अभ्यासक हरपल्याची भावना साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहे.

व्यावहारिक मराठी विषयाचे जनक
मराठी भाषा व्यवहारात लिहिताना कशा पद्धतीने लिहायची, शासकीय पत्राचा मजकूर कसा असावा यांसह भाषेच्या अन्य व्यावहारिक बाजूंची माहिती देणारा ‘व्यावहारिक मराठी’ हा विषय डॉ. नसिराबादकर यांच्या प्रयत्नातून पुढे आला. या विषयाचा अभ्यासक्रमही त्यांनी बनविला. १९८५ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित ‘व्यावहारिक मराठी’ या पुस्तकाने भाषा शुद्धीच्या व मराठी भाषेच्या प्रसारात मोलाची कामगिरी केली. महाराष्ट्रातील बहुतेक विद्यापीठांतील मराठी अभ्यासक्रमात त्याचा समावेश होता. त्याच्या आठ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

‘तत्त्वशील शिक्षकाचे उदाहरण’ 
डॉ. ल. रा. नसिराबादकर हे मराठी भाषेचे अध्यापक, संत साहित्याचे अभ्यासक होतेच; पण ते एक उत्तम शिक्षक होते. विद्यार्थ्यांना त्यांची आदरयुक्त भीती होती. त्यांनी असंख्य विद्यार्थी घडविले. नसिराबादकर म्हणजे तत्त्वशील शिक्षक. शिक्षक कसा असावा, याचे ते उत्तम उदाहरण होते. 
- प्राचार्य श्रीधर हेरवाडे

‘व्यासंगी व्यक्तिमत्त्व हरपले’ 
करवीरनगर वाचन मंदिरात डॉ. ल. रा. नसिराबादकर यांची भूमिका मार्गदर्शकाची होती. अध्यक्षपद किंवा संचालक म्हणून त्यांची कारकीर्द संपल्यानंतरही त्यांचा संस्थेशी असणारा जिव्हाळा कमी झालेला नव्हता. ते वरचेवर येत. आम्हीही त्यांच्याकडून साहित्याचे विविध दृष्टिकोन समजून घ्यायचो. त्यांच्या जाण्याने एक व्यासंगी व्यक्तिमत्त्व हरपले. 
- मनीषा शेणई,
ग्रंथपाल, करवीरनगर वाचन मंदिर

Web Title: La Ra Nasirabadkar no more